22 January 2018

News Flash

भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांची स्वत:च्या जिल्हय़ातच परीक्षा

भाजपचे आमदार बबनराव लोणीकर जिल्हय़ाचे पालकमंत्री आहेत.

वार्ताहर, जालना | Updated: March 1, 2017 12:18 PM

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे. ( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

जिल्हय़ातील प्रामुख्याने भाजप नेतृत्वाची परीक्षा घेणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी गुरुवारी मतदान होत आहे. जिल्हय़ातील पाचपैकी तीन विधानसभा सदस्य भाजपचे असून, जिल्हा परिषदेच्या एकूण ५६ पैकी ३५ जागा या तीन आमदारांच्या मतदारसंघातील आहेत. जिल्हा परिषदेचे मावळते अध्यक्षपद भाजपकडेच असून, भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे हेही जालना लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व करतात. त्यामुळे शिवसेनेपासून वेगळे झाल्यानंतरच्या या निवडणुकीत जिल्हय़ात भाजपला किती यश मिळते, याबद्दल उत्सुकता आहे.

परतूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले भाजपचे आमदार बबनराव लोणीकर जिल्हय़ाचे पालकमंत्री आहेत. त्यांच्या मतदारसंघात जिल्हा परिषदेच्या ११ तर पंचायत समितीच्या २२ जागा आहेत. भाजपचे आमदारद्वय संतोष दानवे (भोकरदन) आणि नारायण कुचे (बदनापूर) यांच्या विधानसभा मतदारसंघात जिल्हा परिषदेच्या २४-२५ जागा आहेत. केंद्रात, राज्यात आणि मावळत्या लोकनिर्वाचित जिल्हा परिषदेत सत्तास्थानी असलेल्या भाजप-शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे आव्हान आहे. खासदार दानवे यांच्या कन्या आशा पांडे (सोयगावदेवी), पालकमंत्री बबनराव लोणीकर यांचे पुत्र राहुल (आष्टी) आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे (रेवगाव) हे तीन जिल्हा परिषदेचे उमेदवार भाजपसाठी महत्त्वाचे आहेत.

निवडणुकीसाठी जिल्हय़ात जिल्हा परिषदेसाठी एकूण २७० उमेदवार असून, पुरुषांच्या (१३१) तुलनेत स्त्री उमेदवारांची संख्या (१३९) अधिक आहे. तर ८ पंचायत समित्यांसाठी एकूण ४९८ उमेदवार असून, त्यामध्येही पुरुषांच्या (२३९) स्त्री उमेदवारांची संख्या (२५९) अधिक आहे.

जिल्हा परिषदेचे सर्वाधिक ५७ उमेदवार जालना तालुक्यात आहेत. राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी या निवडणुकीत भाजप आणि प्रामुख्याने खासदार दानवे यांच्याविरुद्ध आक्रमक प्रचार केला, तर राष्ट्रवादीचे जिल्हय़ातील नेते आमदार राजेश टोपे यांनी आपले प्रभावक्षेत्र असलेले जिल्हा परिषद गट निश्चित करून प्रचाराची व्यूहरचना केली.

First Published on February 17, 2017 12:42 am

Web Title: raosaheb danve 7
  1. No Comments.