भारतीय जनता पक्षातील जिल्हांतर्गत गटबाजीचे जाहीर वाभाडे काढत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नेत्यांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या. दि. ५ जूनपर्यंत जिल्हाध्यक्षाची नियुक्ती करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मंगळवारी नगरला पक्षाच्या वतीने जनकल्याण पर्व कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात दानवे बोलत होते. जिल्ह्य़ाचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे, खासदार दिलीप गांधी, माजी मंत्री बबनराव पाचपुते, पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, आमदार बाळासाहेब मुरकुटे, आमदार स्नेहलता कोल्हे, माजी आमदार चंद्रशेखर कदम, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे आदी या वेळी उपस्थित होते.
नगर जिल्ह्य़ात पक्षातच काडय़ा करणारे कमी नाही असे सांगून दानवे म्हणाले, पक्षाला जिल्हाध्यक्ष नसताना विधानसभेच्या बारापैकी पाच जागा पक्षाने जिंकल्या, हे लक्षात घेतले पाहिजे. पक्षातील सुंदोपसुंदी पाहता कोणाकडे जायचे, असा प्रश्न पडतो. जिल्ह्य़ात किल्लेदारच खूप झाले असून जो, तो आपापल्या तालुक्यापुरता मर्यादित आहे. जिल्हा म्हणून पक्षसंघटनेकडे वेळ देण्यास कोणी तयार नाही. जिल्ह्य़ात पक्षसंघटना मजबूत आहे, मात्र ती एकत्र बांधून ठेवील, असा कोणी मालक नाही. यापुढच्या काळात यात सुधारणा झाल्या पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आगामी काळात ताकदीने लढवणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने आत्तापासूनच तयारीला लागले पाहिजे. येत्या दि. ५ जूनपर्यंत पक्षाच्या जिल्हाध्यक्षाची नियुक्ती करू, असेही दानवे यांनी जाहीर केले.
पालकमंत्री शिंदे यांनी या वेळी जिल्ह्य़ातील काही कामांचा आढावा घेतला. नगर शहराचा बाह्य़वळण रस्ता, कर्जत-श्रीगोंदे तालुक्यातील माळढोक आरक्षण असे महत्वाचे प्रश्न राज्य सरकारने पहिल्या सहा महिन्यांतच सोडवले. नगर येथील भुईकोट किल्याचाही लवकरच सामंजस्य करार होईल, अशी माहिती त्यांनी दिली.
माजी मंत्री पाचपुते, खासदार गांधी, आमदार कोल्हे, आमदार मुरकुटे आदींची या वेळी भाषणे झाली. गांधी यांचा मुद्दा खोडून काढताना पाचपुते यांनी हा जिल्हा सरळ नाही असे ठणकावले. उसाच्या एफआरपीच्या प्रश्नातून लवकर योग्य मार्ग काढावा लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा परिषदेचे अपक्ष सदस्य विश्वनाथ कोरडे (पारनेर) यांच्यासह अनेकांनी या कार्यक्रमात भाजपत प्रवेश केला.