अनिल गोटे यांचा आरोप; आमदारांकडे पत्रकैफियत

नामचीन गुंडांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पक्षात प्रवेश देतात. मते वाढवण्यासाठी गुंडांना प्रवेश दिल्याची वक्तव्ये करतात. भाजपचे केवळ सत्तेसाठी होत असलेले अध:पतन मन अस्वस्थ करणारे आहे. गोपीनाथ मुंडे यांनी राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाविरुद्ध संघर्ष यात्रा काढली होती. आज ते हयात असते, तर तुम्ही असे धाडस केले असते का, असा प्रश्न आमदार अनिल गोटे यांनी उपस्थित केला आहे.

हे अध:पतन आपणा सर्वाना वेगाने विनाशाकडे घेऊन जात आहे, अशी भूमिका गोटे यांनी भाजपच्या सर्व आमदारांना लिहिलेल्या पत्रातून मांडली आहे. विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आपण भाजपच्या आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केल्यानंतर मंगळवारी गोटे यांनी स्वपक्षीय आमदारांना खुले पत्र लिहून प्रदेशाध्यक्षांसह पक्षनेतृत्वावर निशाणा साधला आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडत असलेल्या या घडामोडी भाजपसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या खुल्या पत्रात गोटेंनी आपला आतापर्यंतचा राजकीय इतिहास मांडला आहे. अधिवेशन काळात पक्षाचे अनेक ज्येष्ठ आमदार भेटतात, तेव्हा त्यांच्या मतदारसंघातील निष्ठावान कार्यकर्त्यांना पक्षाच्या नेतृत्वाकडून सापत्न वागणूक दिली जात असल्याबद्दल सांगतात, असे म्हटले आहे. २०१४ च्या निवडणुकीत एकनाथ खडसे यांच्या आग्रहास्तव आपण भाजपकडून उमेदवारी केली. त्या वेळी भाजपच्या बहुतांश स्थानिक नेत्यांनी शिवसेनेचे उमेदवार सुभाष देवरे यांचे काम केले. ते सुद्धा संरक्षण राज्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून, असा आरोपही गोटे यांनी केला आहे. डॉ. सुभाष भामरेंनी अडीच वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून पक्षाच्या फलकांवर माझा फोटो लावणे बंद केल्याचे त्यांनी म्हटले आहे.

राजकीय जीवनात ज्यांनी आपणास प्रचंड विरोध केला, अशा गुंड, बदमाश, वाळूमाफिया, रॉकेलमाफिया, आदिवासींच्या जमिनी बळकावणाऱ्यांना प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे स्वत: पक्षात प्रवेश देतात. मतांची वाढ करण्याकरिता आम्ही गुंडांना प्रवेश दिला, अशी वक्तव्ये करतात, अशा शब्दांत गोटे यांनी पत्रात आश्चर्य व्यक्त केले आहे. आज माझ्यावर आलेली वेळ आपल्या मतदारसंघातही येऊ शकते. आपणास जाणीव व्हावी, यासाठी हा पत्रप्रपंच केला असल्याचे आमदार गोटे यांनी पत्रात म्हटले आहे.

गुंड, बदमाश, वाळूमाफिया, रॉकेलमाफिया, आदिवासींच्या जमिनी बळकावणाऱ्यांना प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे स्वत: पक्षात प्रवेश देतात. मतांची संख्या वाढ करण्याकरिता आम्ही गुंडांना प्रवेश दिला, असेही सांगतात.

– अनिल गोटे, आमदार