कार्यक्रमानिमित्त एकत्र, पण राजकारणाबद्दल अवाक्षरही नाही!

राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अंतर्गत आयोजित मोफत सर्वरोगनिदान आरोग्य महामेळाव्याच्या उद्घाटनानिमित्त शनिवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर एकाच व्यासपीठावर आले. परंतु दोघांनीही आपल्या भाषणात आगामी लोकसभेची उमेदवारी किंवा राजकारणाच्या संदर्भात चकार शब्दही काढला नाही. कार्यक्रमानंतर खासदार दानवे यांचे बंधू भास्कर दानवे यांच्या निवासस्थानी मात्र खोतकर व रावसाहेब दानवे यांनी चहापान केले. पंधरा-वीस मिनिटे हे दोन्ही नेते एकत्र होते.

महामेळाव्याचे उद्घाटन खासदार दानवे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यमंत्री खोतकर होते.दानवे आणि खोतकर यांच्यात  आव्हाने आणि प्रतिआव्हानांची भाषा सुरू असल्याने सध्या जिल्ह्य़ातील राजकीय वर्तुळात एकाच व्यासपीठावर आल्याने हे दोन्ही नेते काय बोलतात याविषयी उत्सुकता होती. प्रत्यक्षात मात्र दोघांनीही शासनाच्या आरोग्यविषयक योजनांची माहिती दिली. या कार्यक्रमास पालकमंत्री बबनराव लोणीकर अनुपस्थित होते.

चहापान केले पण राजकीय चर्चा नाही- दानवे

‘आम्ही फक्त एकत्र चहापान केले. लोकसभा निवडणुकीची उमेदवारी किंवा अन्य कोणत्याही राजकीय विषयावर या वेळी चर्चा केली नाही’, असे खासदार दानवे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. तर आरोग्य महामेळाव्याच्या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना खासदार दानवे म्हणाले, ‘आपण आणि खोतकर काय बोलणार, याकडे माध्यमांचे लक्ष होते. परंतु आम्ही यासंदर्भात योग्यवेळी योग्य माहिती देऊ. मागील २५ वर्षांपासून भाजप आणि शिवसेनेची युती असून विकासासाठी एकत्र येत असतो. पुढील काळातही ही परंपरा कायम ठेवू’

ठाकरे यांच्याशी पुन्हा चर्चा करणार- खोतकर

लोकसभेच्या पाश्र्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी  पुन्हा एकदा भेट घेऊन चर्चा करणार आहे. आतापर्यंत आपण लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याबाबत वक्तव्य केलेले नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही आपणास रविवारी जालना मतदारसंघातच थांबण्याची सूचना केली आहे. आपल्या भेटीसाठी एक शिष्टमंडळ येणार असल्याचे त्यांनी कळविले आहे, असे खोतकर म्हणाले. ‘आपणास पराभूत करण्यासाठी सर्व चोरटे एकत्र आले आहेत’, असे खासदार दानवे यांनी केलेल्या वक्तव्याबाबत विचारले असता खोतकर म्हणाले, ‘यासंदर्भात निश्चित माहिती आपल्याकडे नाही. आपण ते स्पष्टपणे ऐकले नाही. मात्र राजकीय पक्षात मोठय़ा पदावर असलेल्या व्यक्तीने असे वक्तव्य करू नये.’

शासकीय कार्यक्रमात भाजपचा प्रचार

हा शासकीय कार्यक्रम होता. परंतु तरीही भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी या शासकीय कार्यक्रमातून पक्षाचा प्रचार केला, हे चुकीचे आहे.   – राजाभाऊ देशमुख, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस</strong>