सांगली : जयंत पाटील हे चांगले नेते असून ते जर दिसले तर त्यांना भाजपमध्ये घेण्याची आपली तयारी आहे, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सोमवारी सांगलीत पत्रकार बठकीत व्यक्त केले. आ. पाटील यांच्यासाठी काही ऑफर आहे का, असे विचारले असता मात्र त्यांनी मौन पाळले.

राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे दिसेल त्याला भाजपमध्ये घेत आहेत, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी गेल्या आठवडय़ात केली होती. या संदर्भात विचारले असता दानवे म्हणाले, की अन्य पक्षांतही काही चांगल्या विचारांची माणसे आहेत, त्यांच्यासाठी भाजपची दारे सदैव उघडी आहेत. जर आ. पाटील दिसले तर त्यांनाही पक्षात घेतले जाईल.

अहमदनगरमध्ये अभद्र युती केल्याबाबत छेडले असता ते म्हणाले, की शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही मित्रपक्षाच्या भूमिकेकडे लक्ष देऊन होतो. मात्र त्यांनी कोणताच प्रस्ताव दिला नाही. यामुळे भाजप उमेदवाराला महापौरपदासाठी उमेदवारी दाखल करण्याचे निर्देश दिले. ऐनवेळी विरोधकांमध्ये बेबनाव निर्माण झाला आणि त्याचा लाभ भाजपला झाला. भाजप उमेदवाराला पािठबा देण्याचा राष्ट्रवादीचा निर्णय हा स्थानिक पातळीवरचा होता. मुंबई महापालिकेतही आम्ही शिवसेनेला ‘सुमोटो’ पािठबा दिला आहे.

वंचित आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी भाजप-शिवसेना यांच्यामध्ये प्रियकर-प्रेयसीचे नाते असल्याची टीका केली आहे, या बाबत वारंवार विचारले असता दानवे यांनी प्रश्न टाळण्याचाच प्रयत्न केला. एनडीएमधील घटक पक्षांना सोबत घेऊन लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना सामोरे जाण्याची आमची भूमिका असून, मित्रपक्षांनी जर प्रतिकूलता दर्शवली तर लोकसभेच्या ४८ आणि विधानसभेच्या २८८ मतदारसंघांसाठी स्वतंत्र लढण्याची आम्ही तयारी ठेवली असल्याचेही दानवे यांनी सांगितले.

पक्षाचे पूर्वीचे उमदेवार बदलणार काय, याबाबत विचारले असता या बाबतचा निर्णय पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बठकीत घेतला जाणार असून, पाच राज्यांतील निवडणूक निकालाचा आगामी निवडणुकीवर अजिबात परिणाम होणार नाही. धनगर आरक्षणाबाबत टाटा सामाजिक संस्थेच्या अहवालावर येत्या अधिवेशनात निर्णय घेऊन केंद्र शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सांगलीतील गोपीचंद पडळकर हे भाजपचे पदाधिकारी असताना भाजप नेतृत्वावर टीका करीत आहेत, या बाबत दानवे म्हणाले, की त्यांच्यावर अद्याप पक्षाने कोणतीही कारवाई केलेली नाही, अथवा त्यांनी पक्षाकडे राजीनामा दिलेला नाही. पक्षाकडे ते उमेदवारी मागू शकतात.