महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस सातत्याने स्वबळाचा पुनरुच्चार करत आहे. तर पक्षश्रेष्ठीकडून अद्याप ठरलं नसल्याचं सांगितलं जात आहे. असं असलं तरी काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्यामुळे इतर दोन पक्षात चलबिचल होताना दिसत आहे. त्यामुळे काँग्रेसचं नेमकं धोरण काय, अशी चर्चाही सुरू आहे.

या सगळ्या राजकीय चर्चांवर आता भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांनी निर्णय जरी घेतला तरी दुसऱ्या कोणाच्या पोटात का दुखावं, असं ते म्हणाले आहेत.

हेही वाचा – काँग्रेस- राष्ट्रवादीमध्ये धूसफूस; रावसाहेब दानवे म्हणतात, “महाविकास आघाडीचा जन्मच….”

काँग्रेसच्या स्वबळाच्या मुद्द्यावर रावसाहेब दानवे म्हणतात, आता काँग्रेस स्वबळाची भाषा करत आहे. पण देशात काँग्रेसची सरकारं किती याचा काँग्रेसवाल्यांनी विचार करायला हवा आणि ते जरी स्वबळाची भाषा करत आहेत तरी दुसऱ्यांनी पोटात दुखून घेण्याचं काय कारण आहे? कारण ते सरकार एकत्र चालवतात. त्यांनी पक्ष एकमेकांमध्ये विलीन नाही केलेत. सरकार एकत्र चालवतात, पक्ष मात्र वेगळे चालवतात. मग जर तसं असेल तर त्यांना आपापले पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. मग आता येणाऱ्या निवडणुका एकत्र लढायच्या का स्वबळावर लढायच्या हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे.

राज्यात महाविकास आघाडी सरकार असलं तरी काँग्रेसच्या नेत्यांकडून वारंवार स्वबळाचा नारा देत मनातील खदखद व्यक्त केली जात आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले वारंवार आगामी निवडणुकांमध्ये स्वबळाचा नारा देत आहेत.