रयत शिक्षण संस्था या महाराष्ट्रातील नावाजलेल्या शैक्षणिक संस्थेचे कार्याध्यक्ष रावसाहेब शिंदे यांचे सोमवारी रात्री ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी श्रीरामपूरमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
श्रीरामपूरमधील पाडळी गावामध्ये रावसाहेब शिंदे यांचा जन्म झाला. राष्ट्र सेवा दलाच्या माध्यमातून त्यांनी स्वातंत्र्य लढ्यातही सहभाग घेतला होता. त्यावेळी त्यांनी तुरुंगवासही भोगला होता. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ग्रामीण भागातील तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे, यासाठी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेची धुरा रावसाहेब शिंदे यांनी समर्थपणे पेलली होती. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी विविध उपक्रमही राबविले होते. माजी केंद्रीय मंत्री अण्णासाहेब शिंदे यांचे ते लहान बंधू होते.
रावसाहेब शिंदे यांच्या निधनामुळे राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.