वर्ध्यात नववीतल्या मुलीची शोकांतिका

अवघ्या १५ दिवसांपूर्वी त्यांनी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. ती नववीत, तर तो दहावीत. ती त्याला लग्न करू या म्हणाली. त्याने नकार दिला. आता लग्न शक्य नाही म्हणाला. पण शरीरसंबंध  ठेवले. तिने काही दिवसांपूर्वी लग्नासाठी आत्महत्येची धमकी दिली. तो घाबरला. अल्पवयीन मित्राला सोबत घेतले आणि तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण तिने लग्नाचा हट्ट सोडला नाही. ती ऐकेना म्हटल्यावर त्याने आणि त्याच्या मित्राने तिच्यावर बलात्कार केला. एवढय़ावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी शांत डोक्याने तिच्या गळ्यात स्क्रूड्रायव्हर खुपसला आणि हे क्रौर्य पचवण्यासाठी तिचा चेहरा ठेचून विद्रूप केला..

प्रेम म्हणजे काय, हे न कळण्याच्या वयातील मुलांच्या या रक्तबंबाळ गोष्टीने अवघे वर्धा शहर सुन्न झाले आहे. तीन अल्पवयीन मुलामुलींच्या संबंधातील ही गुंतागुंत आणि त्यातून घडलेल्या हत्येची उकल पोलिसांनी आठ तासांत केली. शनिवारी रात्री दहा वाजता घडलेल्या या गुन्ह्य़ाचा छडा पोलिसांनी रविवारी दुपारी लावला. मनावर दगड ठेवून गुन्ह्य़ांची उकल करणाऱ्या आणि गुन्हेगारांना जरब बसवणाऱ्या पोलिसांनाही या गुन्ह्य़ातील क्रौर्याने थक्क केले आहे. या गुन्ह्य़ातील दोघेही आरोपी अल्पवयीन आहेत.   या गुन्ह्य़ातील आरोपी असलेल्या मुलाची मुलीशी रेल्वे स्थानकावर १५ दिवसांपूर्वीच भेट झाली होती. तेथेच त्यांनी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. त्याने लग्नाला नकार दिला पण शरीरसंबंध मात्र सुरू ठेवले. सात दिवसांनी मुलीने लग्नासाठी आत्महत्येची धमकी दिल्यावर तो घाबरला. त्याने मित्राला सोबत घेतले आणि दुचाकीवरून तिघेही वर्ध्याजवळच्या पालोती शिवारात गेले. तेथे त्यांनी मुलीची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. ती लग्नाचा हट्ट सोडत नाही म्हटल्यावर त्यांनी तिच्यावर बळजबरी केली. प्रथम प्रियकराने आणि नंतर त्याच्या मित्राने तिच्या शरीराचे लचके तोडले. ती या प्रकाराची वाच्यता करेल म्हणून त्यांनी ओढणीने तिचा गळा आवळला. झटापटीत ओढणी फाटली. ती जिवाच्या आकांताने त्यांच्या तावडीतून निसटण्याची धडपड करीत होती. पण तिला एकाने पकडले आणि दुसऱ्याने तिच्या गळ्यात स्क्रूड्रायव्हर खुपसला. ती जागेवरच गतप्राण झाली. त्यांनी तिचा चेहरा दगडाने ठेचून विद्रूप केला आणि दोघेही पसार झाले.

हे अल्पवयीन आरोपी वर्ध्याच्या समतानगरातील आहेत. मुलगी गजानननगर परिसरात राहत होती. तिघेही सामान्य कुटुंबांतील. रेल्वे स्थानकावर झालेल्या जुजबी भेटीतून जडलेल्या प्रेमाची ही क्रौर्यकथा काळीज विदीर्ण करते.

मुलीच्या आयुष्याची शोकांतिका

मुलगी, तिचा प्रियकर आणि तिचा मित्र बेपत्ता होते. मुलगी सोमवारपासून बेपत्ता होती. मुलीच्या आई-वडिलांनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांत तक्रार नोंदवली नाही. ती नातलगांकडे न सांगता जात असल्याने आई-वडिलांनी तिचे बेपत्ता होणे गांभीर्याने घेतले नाही. आरोपींना पकडल्यावर एका स्वप्नाळू वयातील मुलीच्या आयुष्याची ही शोकांतिका उजेडात आली. घटनेचे गांभीर्य पाहून पोलीस अधीक्षक डॉ. तेली यांनी हे हत्या प्रकरण स्थानिक गुन्हा शाखेकडे सोपवले. पोलीस निरीक्षक महेंद्र इंगळे यांच्या पथकाने या प्रकरणाची अल्पावधीत उकल केली.