येरवडा येथील इंग्रजी माध्यमाच्या डॉन बॉस्को शाळेतील उपप्राचार्याने चौदा वर्षांच्या विद्यार्थिनीला आपल्या कार्यालयात बोलावून अश्लील चाळे केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात विनयभंग व बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून त्या उप-प्राचार्यास अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना अधिक तपासासाठी २५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. इजु फ्रान्सिस फलकावू (वय ५४, रा. डॉन बॉस्को शाळा कॅम्पस, आयबीएम कंपनीजवळ, येरवडा) असे अटक केलेल्या उप-प्राचार्याचे नाव आहे. याबाबत संबंधित मुलीने तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉन बॉस्को ही इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. या ठिकाणी ही विद्यार्थिनी बाहेरून दहावीमध्ये शिकत आहे. फलकावू हा या शाळेत उपप्राचार्य आहे. या शाळेत चर्च आहे तिथे ही विद्यार्थिनी व तिची आई १ जानेवारी रोजी प्रार्थनेसाठी आले होते. त्यावेळी फलकावू यांनी त्या विद्यार्थिनीला दुसऱ्या दिवशी शाळा सुटल्यानंतर कार्यालयात येऊन भेटण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे ही विद्यार्थिनी २ जानेवारी रोजी दुपारी एकच्या सुमारास त्यांना भेटण्यासाठी गेली. त्यावेळी फलकावू हे कार्यालयात एकटेच होते. ही विद्यार्थिनी आल्यानंतर त्यांनी कार्यालयाचा दरवाजा बंद केला. त्या विद्यार्थिनीस फाईल दाखविण्याच्या बहाण्याने जवळ बोलावून घेतले. तिच्याशी अश्लील चाळे करू लागले. त्या विद्यार्थिनीने दरवाजा उघडून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी दरवाजा उघडू दिला नाही. त्यामुळे ती ओरडू लागली असता तिच्या मैत्रिणी धावत आल्या. त्यांना झालेला प्रकार सांगितला. याबाबत सहायक पोलीस आयुक्त प्रकाश घार्गे यांनी सांगितले की, पोलिसांकडे गेल्यानंतर आपली तक्रार घेतली जाईल का नाही, याबाबत विश्वास वाटत नव्हता. त्यामुळे तिची आई शेजारच्या व्यक्तींच्या मदतीने पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी आली.