लातूर तालुक्यातील काटगाव येथील साने गुरुजी निवासी आश्रमशाळेत शिकणाऱ्या ऊसतोड कामगाराच्या अल्पवयीन मुलीचा बुधवारी सकाळी बलात्कार करून निर्दयपणे खून करण्यात आला. या प्रकरणी आश्रमशाळेतील दोघा कर्मचाऱ्यांवर बलात्काराचा गुन्हा नोंदवून जातेगाव पोलिसांनी गुरुवारी अटक केली. दरम्यान, मृत मुलीचे पुन्हा शवविच्छेदन करण्यात यावे, तसेच व्हिसेरा राखून ठेवावा या मागणीसाठी तिच्या पालकांनी गुरुवारी संध्याकाळपर्यंत तिचे पार्थिव ताब्यात घेतले नव्हते. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
सतीश मोहन मुळे (वय २८) व विलास नागनाथ गायकवाड (वय २९) अशी या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आश्रमशाळेच्या आवारात या मुलीचा मृतदेह सापडला. त्यानंतर तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. शाळेतील दोघा शिक्षकांनी तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप पालकांनी केल्यामुळे तणाव निर्माण झाला. गुरुवारी दोन कर्मचाऱ्यांना याच कारणाने अटक करण्यात आल्याने पालकांनी या मुलीचे पुन्हा शवविच्छेदन करावे व व्हिसेरा राखून टेवावा, अशी मागणी लावून धरत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यामुळे या प्रकारामुळे निर्माण झालेला तणाव कायम होता.
नांदेड जिल्हय़ातील मांजरम (तालुका नायगाव) गावच्या कुटुंबातील तीन भावंडे या आश्रमशाळेत शिकत होती. मृत मुलगी इयत्ता सहावीत शिकत होती. बुधवारी सकाळी ती बेशुद्धावस्थेत आढळली. सोबतच्या मुलीने ती न उठल्याने वसतिगृहाच्या प्रमुखास सांगितले. त्यानंतर तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित करून शवविच्छेदनासाठी पाठवले. मुलीच्या पालकांनी मात्र तिच्यावर बलात्कार झाल्याचा आरोप केला होता.
आश्रमशाळेचे प्रमुख एस. डी. चव्हाण यांनी मात्र ही मुलगी दोन दिवसांपासून आजारी होती. तिच्यावर जवळा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. डॉक्टरांनी परत पाठवल्यानंतर वसतिगृहात आणले. रात्री जेवणानंतर ती औषध घेऊन झोपी गेली व सकाळी ती बेशुद्धावस्थेत आढळली, असे सांगत हात झटकण्याचा प्रयत्न केला. मात्र, आश्रमशाळेतीलच दोन कर्मचाऱ्यांना बलात्काराच्या गुन्हय़ात अटक झाल्याने त्यांचा बचाव उघडय़ावर पडला.