एका अपंग महिलेच्या असहायतेचा फायदा घेऊन चार जणांनी चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याच्या घटनेने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वीच एका युवतीवर निर्जनस्थळी सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. येथील महादेव नगर परिसरातील अपंग महिलेवर रविवारी रात्री हा दुर्धर प्रसंग ओढवला. चार आरोपींपैकी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यातील एक आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर तडीपारीची कारवाईही झालेली आहे.
आरोपींनी पिण्यासाठी पाणी पाहिजे, असे सांगून पीडित महिलेच्या घरात प्रवेश करून तिच्यावर दोन तास अत्याचार करण्यात आले. या महिलेची बहीण जेव्हा घरी आली तेव्हा तिला दार आतून बंद दिसले. तिने दार ठोठावले. त्यानंतर आरोपींनी तिला जिवे मारण्याची धमकी देत पळ काढला. या प्रकाराने दोघी बहिणी चांगल्याच हादरून गेल्या. या घटनेची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यासाठी दोघी घरातून निघाल्या तेव्हा रस्त्यात त्यांना अडवून आरोपींनी दोन्ही बहिणींना आणि त्यांच्या भावाला जिवे मारण्याची धमकी देऊन परतून लावले. अखेरीस सोमवारी सकाळी बळ एकवटून पीडित महिलेने खोलापुरी गेट पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी महिलेच्या घरी जाऊन पाहणी केल्यानंतर घटनास्थळ राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने हे प्रकरण राजापेठ पोलिसांकडे सोपवण्यात आले. पोलिसांनी लगेच सूत्रे हलवून आरोपी आकाश अनिल उगले (२२) आणि सचिन वासुदेव देव्हारे (२२, दोघेही रा. महाजनपुरा) यांना येथील पंचवटी चौकातून ताब्यात घेतले. आरोपींपैकी गजानन चपारिया आणि आदिनेश आठवले फरार असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.
आरोपी आकाश उगले हा पोलिसांच्या रेकॉर्डवर सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर तडीपारीची कारवाईही करण्यात आली आहे. या घटनेने महिलांच्या सुरक्षेचा विषय चर्चेत आला आहे. पोलिसांनी काल कारवाई करताना तडीपार असूनही शहरात राजरोसपणे फिरणाऱ्या अन्य तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय महामार्गाच्या वळण रस्त्यावर रहाटगावनजीक निर्जनस्थळी एका महाविद्यालयीन युवतीवर दोन आरोपींनी तिच्या मित्रासमक्ष बलात्कार केला होता. या घटनेनंतर पोलिसांनी एकांत स्थळी भेटणाऱ्या प्रेमी युगूलांवर लक्ष केंद्रित केले. अनेक जोडप्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्यांच्या पालकांना बोलावून समज दिली. अनेक भागात पोलिसांनी गस्त वाढवली आहे, पण गुन्हेगारीवर अंकूश लावण्यात पोलिसांना अजूनही यश मिळालेले नाही.