नांदेडमध्ये शिक्षकांनीच अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बिलोलीमधील शंकरनगरमध्ये गुरु-शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना घडली आहे. पीडित मुलगी सहावीत शिकत असून सध्या तिची प्रकृती गंभीर आहे. उपचारासाठी तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याप्रकरणी रामतीर्थ पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये दोन शिक्षक आणि त्यांना मदत करणाऱ्या तिघांचा समावेश आहे. पोलिसांनी कलम ३७६ आणि पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
काय आहे प्रकरण ?
नांदेडमधील शंकरनगरमध्ये ही घटना घडली आहे. पीडित मुलगी शिकत असलेल्या शाळेतील शिक्षकांनीच तिच्यावर लैगिंक अत्याचार केले. पीडित विद्यार्थिनीला एक व्हिडीओ दाखवण्याचा बहाणा करत एका खोलीत नेण्यात आलं. तिथे अश्लील व्हिडीओ दाखवत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. मुलीन घरी गेल्यानंतर घडलेला सगळा प्रकार कुटुंबीयांना सांगितला. मुलीची प्रकृती नाजूक असल्याने तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
घडलेला प्रकार कळताच विद्यालय परिसरात खळबळ उडाली. धक्कादायक म्हणजे, मुलीच्या आईने मुख्याध्यापकांकडे तक्रार करुनदेखील कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. याऊलट या घटनेची वाच्यता कुठेही करु नये यासाठी त्यांच्याकडून शपथपत्र लिहून घेण्यात आलं अशी माहिती मिळत आहे. पोलिसांनी घटनेची माहिती मिळाल्यानंतर मुलीच्या कुटुंबाशी संपर्क साधला. कुटुंबीयांना विश्वासात घेऊन संपूर्ण घटनेची माहिती मिळवली. यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी एकूण पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 20, 2020 11:22 am