सफाई कर्मचाऱ्याने अत्याचार करून बालवाडीतील पाच वर्षीय बालिकेची हत्या केल्याची अफवा पसरल्यामुळे येथील आझादनगर भागातील एका प्राथमिक शाळेची इमारत तसेच पोलिसांची वाहने जमावाने पेटवून दिल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. अत्याचार करणाऱ्या संशयितास ताब्यात द्यावे असा हेका धरत जमावाने सायंकाळी उशिरापर्यंत शाळा परिसरात ठाण मांडल्याने शहराच्या पूर्व भागात तणाव निर्माण झाला.
दरम्यान, संबंधित बालिकेचा विनयभंग झाल्याचे पोलिसांनी मान्य केले. परंतु ती जिवंत असल्याचा खुलासा करत जमावाला शांत करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून उशिरापर्यंत सुरू होता. या घटनेनंतर जिल्हा पोलीस प्रमुख संजय मोहिते यांनी घटनास्थळी धाव घेतली. शहरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
आयेशानगर भागात खातून एज्युकेशन संस्था संचलित मदर आयेशा प्राथमिक व पूर्व प्राथमिक ऊर्दू शाळा आहे. या शाळेत शिक्षण घेणाऱ्या बालिकेचा बुधवारी एका सफाई कर्मचाऱ्याने विनयभंग केला. भेदरलेल्या बालिकेने पालकांना ही माहिती दिली. शुक्रवारी संतप्त पालक जाब विचारण्यासाठी शाळेत पोचले. मात्र, तेथे व्यवस्थापनाशी त्यांचा वाद झाला. दरम्यानच्या काळात संबंधित शाळेतील बालिकेवर अत्याचार करून हत्या झाल्याची अफवा शहरात पसरली. त्यामुळे दुपारी दोनच्या सुमारास मोठा जमाव परिसरात जमला. जमावाने शाळेच्या इमारतीवर दगडफेक सुरू केली. अपर पोलीस अधीक्षक सुनील कडासने हे फौज फाटय़ासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सौम्य लाठीमार करून जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. पोलीस बळाच्या तुलनेत जमाव अधिक संख्येने असल्याने पोलिसांनी काहीशी संयमाची भूमिका घेतली. मात्र जमाव अधिकच हिंसक होत गेला. प्रसंगावधान राखून पोलिसांनी शाळेचे कर्मचारी व शिक्षकांना सुरक्षितपणे बाहेर काढले. या वेळी जमावाने शाळेतील फर्निचर, कागदपत्रे, संगणक तसेच इमारतीला आग लावून दिली. शाळेच्या आवारात उभ्या असणाऱ्या पोलिसांच्या दोन मोटारी व दुचाकी वाहने पेटवून दिली.
हा जमाव सायंकाळपर्यंत शाळेच्या परिसरात ठाण मांडून होता. संशयिताला आमच्या ताब्यात द्यावे, असा त्याचा आग्रह होता. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जिल्हा पोलीस प्रमुख मोहिते यांनी नियंत्रण कक्षात शांतता समितीची बैठक घेऊन सदस्य व प्रमुख मौलानांना शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. संबंधित बालिका व तिच्या पालकांची आपण समक्ष भेट घेतली असून, अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन मोहिते यांनी केले. या घटनेत धुळे मार्गावरील वाहनांवर दगडफेक झाली. सुरक्षिततेचा उपाय म्हणून पोलिसांनी वाहतूक वळविण्याचा निर्णय घेतला. सायंकाळपर्यंत बाहेरगावहून मोठय़ा प्रमाणात पोलीस कुमक मागविण्यात आली. संशयित फरार झाला असला तरी लवकरच त्याला अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.