बलात्कारानंतर मानसिक धक्क्यात असतानाही पीडित तरुणीने धाडस दाखवत बलात्काऱ्यांना रुममध्ये लॉक करुन पळ काढल्याची घटना समोर आली आहे. नागपूरमध्ये ही घटना घडली आहे. १८ वर्षीय पीडित तरुणीने पळून जाताना पुरावा म्हणून सोबत आरोपींचे मोबाइलही पळवले. तरुणीने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे पोलिसांनी मोबाइलच्या सहाय्याने आरोपींची ओळख पटवली आहे.

पीडित तरुणी विद्यार्थिनी असून ब्युटिशिअन होण्याची तिची इच्छा आहे. शनिवारी ब्यूटी पार्लरला जाण्यासाठी ती घरातून निघाली असता तिचं अपहरण करण्यात आलं.

१८ वर्षीय तरुणीचं शेख सलम आणि श्रीराम श्रीबास या दोघांनी अपहरण केलं होतं. अपहरण केल्यानंतर तिचे हात पाय बांधून जबरदस्तीने दारु पाजण्यात आली. दोनवेळा तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. दारु प्यायल्यानंतर दोघेही आरोपी झोपेत असताना तरुणीने वेळ साधून तेथून पळ काढला. पळून जाताना तिने दोघांना रुममध्ये लॉक केलं आणि त्यांचे मोबाइल सोबत नेले. तरुणीने थेट पोलीस स्टेशन गाठत तक्रार केली. पोलिसांनी मोबाइलच्या सहाय्याने आरोपींची ओळख पटवली आहे. दोघाही आरोपींवर याआधी अनेक गुन्हे दाखल असून सध्या ते फरार आहेत.