सोलापूर शहराच्या तुलनेत आतापर्यंत करोनाचा कमी प्रादुर्भाव राहिलेल्या जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्येही आता झपाट्याने करोनाबाधित रूग्ण आढळून येत आहेत. काल एकाच दिवशी २१२ नवीन बाधित रूग्ण सापडले होते. त्यानंतर आज शनिवारी, दुसऱ्या दिवशी पुन्हा १७९ बाधित रूग्णांची भर पडली. त्यामुळे अल्पावधीतच ग्रामीण भागातील बाधित रूग्णसंख्या १,५४३ वर पोहोचली. तर सोलापूर शहरातील रूग्णसंख्या ३,५५७ वर पोहोचली आहे. शहर व जिल्ह्यातील मृतांचा आकडा ३६१ झाला आहे.

आज रात्री हाती आलेल्या अहवालानुसार जिल्हा ग्रामीणमध्ये २,०६१ चाचणी अहवाल प्राप्त झाले. त्यांपैकी १७९ चाचणी अहवाल सकारात्मक आढळून आले. यात ११७ पुरूष व ६२ महिलांचा समावेश आहे. मंगळवेढा येथे उपकारागृहातील २८ कच्च्या कैद्यांनाही करोनाची बाधा झाली आहे. मंगळवेढा तालुक्यात आज नव्याने ३७ बाधित रूग्ण सापडले. यापूर्वी सोलापूर जिल्हा कारागृहात ६२ कच्चे कैदी करोनाबाधित झाले होते. त्यात एकाचा मृत्यूही झाला होता. त्यानंतर बार्शी येथील उपकारागृहातही कच्च्या कैद्यांना करोनाची बाधा झाली होती. त्यानंतर आता मंगळवेढा येथेही कच्चे कैदी करोनाबाधित निघाले आहेत.

आतापर्यंत तीन महिन्यात सोलापूर शहरात करोनाचा प्रसार वेगाने सुरू होता. त्या तुलनेत ग्रामीण भागात तुरळक प्रमाणात रूग्ण सापडत होते. परंतू, अलिकडे काही दिवसांपासून ग्रामीण भागातील बाधित रूग्ण सापडण्याचा वेग शहराच्या तुलनेत अधिक वाढला आहे. विशेषतः प्रशासनाने करोना विषाणू आटोक्यात येत नसल्यामुळे एकीकडे दहा दिवसांची संपूर्ण संचारबंदी लागू केली असताना दुसरीकडे प्रतिबंधित सांसर्गिक क्षेत्रांत करोनाबळी रोखण्यासाठी ज्येष्ठ व मधुमेह, रक्तदाबासह अन्य आजारांनी पछाडलेल्या संशयित रूग्णांच्या करोनाशी संबंधित जलद चाचण्या (ॲन्टिजेन टेस्ट) करण्याची मोहीम हाती घेतली आहे. ग्रामीण भागात पाच हजार जलद चाचण्या केल्या जाणार आहेत. शहरातही जलद चाचण्या होत आहेत.

शहर व जिल्ह्यात मिळून आतापर्यंत बाधित रूग्णसंख्या ५,१२० वर पोहोचली असून मृत्युचा आकडा ३६१ झाला आहे. करोनामुक्त होण्याचे प्रमाण ५० टक्क्यांच्या खाली आहे.