विविध रंगछटा असलेला आकर्षक पतंग

नीरज राऊत, पालघर

आकर्षक व देखणा अशी ख्यातील असलेला दुर्मीळ ‘मून मॉथ’ नावाचा पतंग पालघरजवळील खारेकुरण गावात आढळून आला. चिंचणी गावातील वन्यजीवन छायाचित्रणाचा छंद असलेल्या एका छायाचित्रकाराला हा पतंग आढळून आला. पांढराशुभ्र रंग, लारसर पाय, डोक्यावर पिवळा तुरा आणि हिरवट पंख असलेला हा पतंग खूपच आकर्षक आहे.

पालघरपासून सात किलोमीटर अंतरावर खारेकुरण गावातील एका वाडीत या पतंगाचे दर्शन झाले. बाबर यांनी तात्काळ त्याचे छायाचित्र काढले. हा पतंग २०१४मध्ये तमिळनाडू येथील ट्रिची येथे आढळला होता. हवामान बदलल्यामुळे मॉथ स्थलांतर करतात. ‘मून मॉथ’ हा पालघर भागात दुर्मीळ असला तरी काही ठिकाणी त्याचा वावर आहे, अशी माहिती पालघरच्या सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख प्रा. सीमा देशमुख यांनी सांगितले.

पतंगाची वैशिष्टय़े

* अ‍ॅक्टियास लूना या शास्त्रीय नावाने हा पतंग ओळखला जातो. या पतंगाला रेशीम पतंग म्हणून ओळखले जाते.

*  पांढरे शरीर, लालसर पाय, डोक्यावर पिवळा तुरा आणि हिरवट पंख ही याची रंगछटा.

*  पंख सामान्यत: ४.५ इंच लांब असतात, तर विस्तारल्यावर ७ इंचांपेक्षा जास्त असतात.

*  मादी एका वेळी

२०० ते ४०० अंडी घालते.

अंडी एका आठवडय़ानंतर फुटतात.

पतंग, फुलपाखरे त्यांच्या विशिष्ट खाद्य वनस्पतीवरच जन्माला येतात. पालघर भागामध्ये ब्लू मॉरमॉन फुलपाखरासह अनेक दुर्मीळ पतंग, फुलपाखरे मिळतात. याचे कारण त्यांना लागणाऱ्या खाद्यवनस्पती अजूनही पालघरमध्ये तग धरून आहेत. मात्र वाढत्या शहरीकरणामुळे भविष्यात या खाद्यवनस्पती आणि अन्य वनसंपदा नष्ट होऊन अनेक फुलपाखरे, पतंगांच्या प्रजाती नष्ट होण्याची शक्यता आहे. 

– प्रा. भूषण भोईर, जीवशास्त्र विभाग, सोनोपंत दांडेकर महाविद्यालय