अजिंठा आणि वेरूळ लेण्यांच्या दुर्मीळ चित्राकृती भारतातच नव्हे, तर जगभरातही अगदी मोजक्याच प्रमाणात शिल्लक आहेत. आजवर जिथे जिथे या चित्राकृती ठेवण्यात आल्या तिथे त्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचा इतिहास आहे. मात्र, अजिंठा आणि मध्य प्रदेशातील बाघ लेण्यांमधील नऊ दुर्मीळ चित्राकृतींचा इतिहास बघता लखनऊच्या नॅशनल रिसर्च लेबॉरेटरी फॉर कन्झर्वेशन ऑफ कल्चरल प्रॉपर्टीच्या (एनआरएलसी) नागपुरातील चमूने त्या पुन्हा एकदा जिवंत केल्या आहेत.
जगप्रसिद्ध अजिंठा आणि बाघ लेणी नष्ट होण्याच्या मार्गावर असताना त्या चित्राकृती समजून घेण्यासाठी १९व्या शतकात त्यांच्या काही प्रती तयार करण्यात आल्या. त्याच्या २७ प्रती लंडनच्या क्रिस्टल पॅलेसमध्ये ठेवण्यात आल्या. दुर्दैवाने १८६६ मध्ये या पॅलेसला आग लागून सर्व चित्राकृती भस्मसात झाल्या. त्यानंतर १८७२ मध्ये बॉम्बे स्कूल ऑफ आर्टचे प्रधानाध्यापक व बॉम्बे प्रेसिडेन्सी कमिशन जॉन ग्रिफ्थ यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांकडून या चित्राकृती तयार करवून घेतल्या. तब्बल १३ वष्रे त्यावर काम केल्यानंतर ३०० चित्राकृती तयार झाल्या. लंडनच्या इम्पिरिअल इन्स्टिटय़ूट ऑन एक्झिबिशन रोड येथे या चित्राकृती लावण्यात आल्यानंतर तेथेही १८८५ मध्ये आग लागली आणि अध्र्याहून अधिक चित्राकृती भस्मसात झाल्या. नागपुरातील चित्रकला महाविद्यालयाचे कलावंत दाभाडे यांनीही अजिंठा आणि बाघ लेण्यांच्या चित्राकृती तयार केल्या. त्यातील नऊ चित्राकृती त्यांनी मध्यवर्ती संग्रहालयाच्या सुपूर्द केल्या, पण संग्रहालय प्रशासनाला हा दुर्मीळ ठेवा जपता आला नाही. ७५ टक्के मृतवत झालेल्या या चित्राकृती पुन्हा जिवंत करणे कठीण काम होते, पण एनआरएलसीचे संचालक बी. व्ही. खरबडे यांनी लीना हाते यांच्यावर ही जबाबदारी सोपवली.
* आठ कलाकृती कापडांवर
आणि एक लाकडावर होती. कापडाला बुरशी लागली.
* काही ठिकाणी चित्रांचे तुकडे पडले तर काही ठिकाणी कागद जळाला. लाकडावरची कलाकृती पूर्णपणे गुंडाळली गेली होती.
* हात लावला तर चुरा होईल, अशा या चित्राकृतींवर मेहनत घेऊन लीना हाते व त्यांच्या चमूने दुर्मीळ ठेवा जिवंत केला.