एजाज हुसेन मुजावर

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निष्ठा ठेवून प्रामाणिकपणे काम करीत असताना नेतृत्वाकडून सतत अपमानास्पद डावलले जात असून उलट, पक्षाच्या विरोधात ज्यांनी अधूनमधून स्वत:च्या लाभासाठी भूमिका घेतली, अशा स्वार्थी मंडळींना प्रतिष्ठा व मान-सन्मान मिळतो, अशा शब्दात नाराजी व्यक्त करीत सोलापूर जिल्ह्य़ाच्या करमाळा तालुक्यातील राष्ट्रवादीच्या नेत्या रश्मी बागल-कोलते यांनी पक्षातून बाहेर पडत थेट शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सोलापुरातील राष्ट्रवादीला पडलेले खिंडार थांबायला तयार नाही.

रश्मी बागल आपल्या समर्थकांसह उद्या मंगळवारी मुंबईत ‘मातोश्री’वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून घेत अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. तथापि, इकडे जिल्ह्य़ात राष्ट्रवादीला पडलेले भगदाड थोपविता येणे कठीण झाले असताना दुसरीकडे दोन्ही काँग्रेसमधून भाजप किंवा शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या वा करू इच्छिणाऱ्या उपऱ्या नेत्यांमुळे भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षात धुसफुस पाहावयास मिळत आहे. करमाळ्याच्या रश्मी बागल यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर याच करमाळ्याचे शिवसेनेचे आमदार नारायण पाटील यांच्या गटात अस्वस्थता वाढली आहे.

पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर जिल्हा हा राष्ट्रवादीसाठी सर्वाधिक सुरक्षित गड म्हणून आतापर्यंत ओळखला जात असे. परंतु २००९ सालच्या विधानसभा निवडणुकीत पक्षांतर्गत साठमारीच्या राजकारणातून पक्षाचे वजनदार नेते, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचा दारुण पराभव झाल्यापासून जिल्ह्य़ातील राजकीय समीकरणे बदलत गेली आणि परिणामी अखेर गेल्या लोकसभा निवडणुकीत प्रतिक्रियावादी राजकीय घडामोडी घडत मोहिते-पाटील घराण्याने राष्ट्रवादीपासून दुरावत थेट भाजपशी जवळीक साधली. खरे तर तेव्हापासून केवळ सोलापुरात नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या घडाळ्याचे काटे उलटय़ा दिशेने फिरू लागले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर तर राष्ट्रवादीचा सोलापुरातील एकेकाळचा अभेद्य बालेकिल्ला नामशेष होण्याची चिन्हे दिसत आहेत. मोहिते-पाटील घराण्यानंतर आतापर्यंत पक्षांतर्गत मोहिते-पाटीलविरोधी राजकारणात मोठे झालेले माढय़ाचे आमदार बबनराव शिंदे व त्यांचे बंधू तथा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचाही मार्ग भाजपच्या दिशेने जात असल्याचे संकेत मिळत आहेत. तर दुसरीकडे दुसरे शरदनिष्ठ आमदार दिलीप सोपल यांनीही आगामी बार्शी विधानसभा निवडणूक कोणत्या पक्षाकडून लढवायची, याचा निर्णय येत्या आठवडाभरात घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहेत. माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्यासह पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे हे पक्षापासून दूर असून त्यांचे पुत्र तथा जिल्हा परिषदेचे सभापती विजयराज डोंगरे हे यापूर्वीच भाजपमध्ये दाखल झाले आहेत.  सोलापुरात राष्ट्रवादीच्या जिल्हा निरीक्षकपदाची जबाबदारी दस्तुरखुद्द अजित पवार यांच्याकडे असताना पक्षाची एका पाठोपाठ एक अशी ही पडझड होत आहे. प्राप्त परिस्थितीत राष्ट्रवादीच्या विधानसभेच्या पाच जागांपैकी एक तरी जागा टिकविता येईल काय, याबाबतही शंका उपस्थित होत आहे.

पक्षाच्या विरोधात कारवाया करून देखील संजय शिंदे यांचे पवार काका-पुतण्याबरोबरचे संबंध चांगलेच राहिले आहेत. त्यानंतर संजय शिंदे यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक अपक्ष लढविली आणि भाजपचा पाठिंबा घेऊन महाआघाडीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळविले. पक्षांतर्गत राजकारणात केवळ मोहिते-पाटील गटाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादीने संजय शिंदे यांना उघडपणे मदत केली होती.  दुसरीकडे जिल्हा परिषदेत महाआघाडीच्या माध्यमातून का होईना सत्ता मिळविता आल्यामुळे भाजपदेखील खुशीत राहिला.