महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आता दैनिक सामनाची सूत्रे संभाळणार आहेत. त्यांची दैनिक सामनाच्या संपादकपदी निवड करण्यात आली आहे. त्या सामनाच्या पहिल्याच महिला संपादक आहेत. उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. सामनाच्या संपादकपदामुळे अडचणी निर्माण होण्याची शक्यता असल्याने  रश्मी ठाकरे यांची सामनाच्या संपादकपदी निवड करण्यात आली.

आदित्य ठाकरे आज पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले आहेत. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना रश्मी ठाकरे यांची दैनिक सामनाच्या संपादकपदी निवड होण्याबाबत प्रश्न विचारला, त्यावर त्यांनी आई संपादक झाली, आनंदाची गोष्ट आहे. ही मोठी जबाबदार आहे. आम्ही सर्व त्यांच्यासोबत आहोत, अशी प्रतिक्रिया दिली.

सामनामधून शिवसेनेची राजकीय भूमिका, विचार प्रखरपणे मांडले जातात. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत सामनाचे कार्यकारी संपादक आहेत. सामनामध्ये लिहिले जाणारे अग्रलेख देशभरात चर्चेचा विषय असतात. ९० च्या दशकात आपली राजकीय भूमिका, विचार महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सामना या दैनिकाची सुरुवात केली. २३ जानेवारी, १९८९ रोजी मध्यरात्री ‘सामना’ दैनिकाची सुरुवात झाली. दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात, मोठ्या थाटामाटात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते ‘सामना’चे प्रकाशन करण्यात आले.

“हिंदुत्वाचा प्रभावीपणे प्रचार करण्यासाठी आणि दररोज होणाऱ्या आरोपांना उत्तर देण्यासाठी, सामना हे नवे शस्त्र असेल आणि उद्या पाळी आली तर, आम्हाला खऱ्या शस्त्रालाही हात घालावा लागेल” असे प्रकाशनाप्रसंगी बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते.