30 November 2020

News Flash

राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे निधन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्यासमवेत त्यांनी काम केले होते.

राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज

लातूर : लोकसत्ता वार्ताहर

अहमदपूर येथील वीर मठ संस्थांचे मठाधिपती डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज (वय १०३) यांचे मंगळवारी (१ सप्टेंबर) नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना सायंकाळी चार वाजता निधन झाले. डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचा जन्म १९१७मध्ये झाला होता. १९३२ साली वीर मठ संस्थान अहमदपूरचे उत्तराधिकारी म्हणून त्यांची घोषणा झाली. १९३८ साली आग्रा येथून त्यांनी साहित्य विशारदची पदवी प्राप्त केली होती. १९४५ साली लाहोर विश्वविद्यालयातून त्यांनी एमबीबीएसची पदवी घेतली होती. १९४७च्या स्वातंत्र्यसंग्रामात त्यांनी सक्रिय सहभाग दिला व यासाठी दोन वेळा तुरुंगवासही भोगला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते प्रचारक होते संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्यासमवेत त्यांनी काम केले. त्यानंतर अहमदपूर येथे परत येऊन त्यांनी धार्मिक कामात स्वतःला झोकून दिले. त्यांच्या अनेक ग्रंथसंपदाही प्रसिद्ध आहेत. इंग्रजी, हिंदी, मराठी, कन्नड, पंजाबी भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. ते सिध्दहस्त लेखक व उत्तम वक्ते होते. त्यांची राहणी अत्यंत साधी होती. भक्तांनी हार दिला तर ते त्यांच्याच गळ्यात घालत, इतके ते विरक्त होते.

वयाच्या १०३ वर्षापर्यंत ही त्यांची प्रकृती ठणठणीत होती. चार दिवसांपूर्वी त्यांची तब्येत खालावल्यामुळे त्यांना नांदेड येथील रुग्णालयात हलवण्यात आले होते. रविवारी सायंकाळपासून त्यांची प्रकृती खालावत होती. त्यांच्यावर उपचार सुरू होते. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र त्यांना यश आले नाही. त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या इच्छेनुसार अहमदपूर येथील भक्तीस्थळावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2020 6:24 pm

Web Title: rashtrasant doctor shivling shivacharya maharaj passes away at 103 vjb 91
Next Stories
1 चंद्रपूर जिल्ह्यातील पुराचा महावितरणास मोठा फटका
2 Coronavirus : सर्वाधिक चाचण्या करणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचाही समावेश
3 “हिंदू धर्माचा ठेका कोणा एकाकडे नाही”; मंदिरं उघडण्यावरुन एमआयएम-शिवसेना आमनेसामने
Just Now!
X