सांगली जिल्ह्याच्या पलूस तालुक्यातील बांबवडे गावचे सुपूत्र असलेल्या सहायक पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना विधानभवन परिसरात झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ बांबवडे ग्रामस्थांनी मंगळवारी रास्ता रोको आंदोलन केले. दोषी आमदारांवर निलंबनाची कारवाई होईपर्यंत गाव बंद आंदोलन सुरू ठेवण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला.
क्रांती सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पोपटराव संकपाळ, गावच्या प्रथम नागरिक सुवर्णा संकपाळ, ग्रामपंचायत सदस्य विक्रम संकपाळ, विश्वास पवार, विकास सोसायटी अध्यक्ष नंदकुमार पवार, गणेश सोसायटी अध्यक्ष अनिल पवार, पलूस तालुका काँग्रेस अध्यक्ष ए. डी. पाटील, माजी पंचायत समिती सदस्य विश्वासराव पाटील आदींनी दुपारी एक वाजल्यापासून पलूस-सांगली रस्त्यावर रास्ता रोको केला. या वेळी काही युवकांनी टायर पेटवून निषेध नोंदविला. पोलिस अधीक्षक दिलीप सावंत व पलूसचे तहसीलदार शिवाजी शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन ग्रामस्थांना शांततेचे आवाहन केले. या आंदोलनामुळे संपूर्ण गाव रस्त्यावर उतरले होते. या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सहायक पोलिस निरीक्षक गोंदकर यांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.
(संग्रहित छायाचित्र)