सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर सोनेगाव चौकात रस्ता ओलांडण्यासाठी उड्डाणपूल अथवा पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे एका शाळकरी मुलाला जीव गमवावा लागला. रस्ता ओलांडून घराकडे जाणार्‍या संदेश गव्हार या चिमुकल्याला भरधाव कारने धडक दिल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. टोलबरोबर जीवपण घेता काय? असा संतप्त सवाल उपस्थित करीत येडशी ग्रामस्थांनी मृतदेह रस्त्यावर ठेवून राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले.

टोलनाका आणि पर्यायी सुविधा यावरून येडशी येथील ग्रामस्थ आणि आयआरबी कंपनी यांच्यात सध्या धुसफूस सुरू आहे. त्यातच सोनेगाव चौकात बुधवारी भरधाव कारने संदेश गव्हार या शाळकरी मुलाला जोराची धडक दिली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. राष्ट्रीय महामार्गावरील सोनेगाव रस्त्यालगत असलेल्या तांड्याशेजारी शिवशंभू चौक आहे. या चौकात रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू झाल्यापासून उड्डाण पुलाची मागणी होती. येथे पूल नसल्याने रस्ता ओलांडून, जीव मुठीत घेऊन अनेकांना घराकडे जावे लागते. संदेश हा रस्ता ओलांडून जात असताना भरधाव वेगातील कारने त्यास चिरडले. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी त्याच्या मृतदेहासह प्रशासन आणि आयआरबी कंपनीविरोधात घोषणाबाजी करत रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक बराच काळ खोळंबली होती.