नाशिकमधील बोटॅनिकल गार्डनला उद्या उद्योगपती रतन टाटा भेट देणार आहेत. टाटा ट्रस्टच्याच कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) बोटॅनिकल गार्डनची निर्मिती करण्यात आली. रतन टाटा यांच्यासह मनसेप्रमुख राज ठाकरेदेखील उद्या नाशिकमध्ये उपस्थित राहणार आहेत. ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा स्वतः कधी या उद्यानाला भेट देतात, याबाबत नाशिककरांच्या मनात गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता निर्माण झाली होती ती आता पूर्ण होणार आहे. वनौषधी उद्यानाच्या लोकार्पण सोहळ्यानंतर या प्रकल्पाला भेट देण्यास येण्याची विनंती राज ठाकरे यांनी टाटा यांना केली होती. या विनंतीला मान देत रतन टाटा उद्या या उद्यानाच्या भेटीस येत आहेत.

काही दिवसांपूर्वीच नाशिकमधील बोटॅनिकल गार्डनचे प्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या गार्डनमध्ये नाशिककरांना पर्यावरण पूरक संदेश मिळावा, या हेतूने ‘कथा अरण्याची’ या साउंड व लाईट शोला सुरवात झाली. यामुळे हळूहळू नाशिककरांनी व विविध ठिकाणाहून आलेल्या पर्यटकांनी या वनौषधी उद्यानाला भेटी देण्यास सुरुवात झाली. मराठी चित्रपटसृष्टीतील तारे-तारकांनीदेखील या गार्डनला भेट दिली आहे.

सध्या नाशिकमध्ये मनसेला गळती लागली आहे. मनसेचे नगरसेवक इतर पक्षांमध्ये जात असल्याने राज ठाकरे यांनी नाशिककरांचे मन वळवण्यासाठी मराठी सिने तारे-तारकांना पक्षाने केलेल्या विविध प्रकल्पांची सहल घडवून आणली. नाशिकमधील अनेक विकास प्रकल्पांसाठी राज ठाकरे यांनी देशातील विविध अग्रणी

उद्योगसमूहांकडून सीएसआर निधीद्वारे गोदा पार्क, चिल्ड्रन ट्रॅफिक पार्क, बाळासाहेब ठाकरे ऐतिहासिक शस्त्रसंग्रहालय असे विविध प्रकल्प सुरु केले. नाशिकमधील नवीन रिंगरोडचे नाशिककरांनी कौतुक देखील केले.