सोलापूर महापालिकेतील काँग्रेसच्या कारभा-याच्या मुजोरीला कंटाळून विनंती बदली मागून पदभार सोडलेले आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या समर्थनार्थ बुधवारी सर्व प्रमुख पक्ष तथा संघटनांनी पुकारलेल्या ‘सोलापूर बंद’ला संमिश्र प्रतिसाद मिळाला. पाच प्रमुख मार्गावरून मोर्चे काढण्यात येणार होते. परंतु पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे अधिकृतपणे मोर्चे काढता आले नाहीत. परंतु तरीदेखील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधी व प्रमुख कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आयुक्त गुडेवार यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. जिल्हाधिकारी डॉ.प्रवीण गेडाम यांना भेटून निवेदनही सादर करण्यात आले.
महापालिकेत स्वच्छ, पारदर्शी आणि लोकाभिमुख प्रशासन चालविणारे आयुक्त गुडेवार यांची सत्ताधारी काँग्रेसच्या नगरसेवकांनी पाण्याच्या प्रश्नाचे निमित्त करून कोंडी करण्याचा प्रयत्न केला. सत्ताधा-यांकडून होणा-या सततच्या त्रासामुळे शेवटी आयुक्त गुडेवार यांनी विनंती बदली मागून पदभार सोडला. त्यामुळे शहरात खळबळ उडून सामान्य नागरिक  गुडेवार यांच्या बाजूने रस्त्यावर उतरले. महापालिकेतील पाच हजार कर्मचा-यानीही बंद पुकारून सामूहिक राजीनामे देण्याची तयारी दर्शविली. तर विरोधी पक्षांनी बुधवारी ‘सोलापूर बंद’ची हाक दिली. या ‘बंद’ला संमिश्र प्रतिसाद लाभला. महापालिकेत कर्मचा-यानी गुडेवार यांच्या आवाहनानुसार सामान्य नागरिक वेठीला धरले जाऊ नयेत म्हणून ‘बंद’मध्ये सहभाग घेतला नाही. पालिका परिवहन विभागाची बससेवाही नियमितपणे सुरू होती.
बंदच्या काळात नवी पेठ, मेकॅनिक चौक, पांजरापोळ चौक, बाळीवेस, चाटी गल्ली, सराफ कट्टा आदी भागात उत्तम प्रतिसाद मिळून बंद पाळण्यात आला. तर अशोक चौक, साखर पेठ, कुंभार वेस, मंगळवार पेठ, पार्क चौक, विजापूर वेस, सात रस्ता, जुळे सोलापूर आदी भागात समिश्र स्वरूपात बंद पाळण्यात आला. बंद काळात प्रमुख पाच ठिकाणांहून मोर्चे काढण्याचे नियोजन विरोधी पक्षांनी आखले होते. परंतु पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे मोर्चे निघू शकले नाहीत. तरी सुध्दा पांजरापोळ चौकातून बसपाचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली गुडेवार यांच्या समर्थनार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. तर भवानी पेठेतून भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेला मोर्चा पोलिसांनी रोखला. तेव्हा ‘रास्ता रोको’ करणा-या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
दरम्यान, दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विरोधी पक्षाचे लोकप्रतिनिधी, नेते व प्रमुख कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन घोषणाबाजी केली. जिल्हाधिकारी डॉ. गेडाम यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर करण्यात आले. या वेळी भाजपचे शहराध्यक्ष, आमदार विजय देशमुख, माकपचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर, शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख पुरूषोत्तम बरडे, जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, शहर प्रमुख प्रताप चव्हाण, बसपाचे नगरसेवक आनंद चंदनशिवे, भाकपचे अॅड. रा. गो. म्हेत्रस, मनसेचे शहराध्यक्ष युवराज चुंबळकर आदींचा प्रामुख्याने सहभाग होता.
आयुक्त गुडेवार यांच्या बाजूने सकाळपासूनच अनेक रस्त्यांवर, चौकांमध्ये विविध सार्वजनिक संघटना व मंडळांनी गुडेवार यांना त्रास देणा-या पालिकेतील सत्ताधा-याच्या निषेधार्थ व ‘बंद’ला पाठिंबा देणारे फलक झळकावले होते. रस्त्यावर गटा-गटाने उभे राहून नागरिक गुडेवार यांच्या कार्यक्षम प्रशासनाचे कौतुक आणि सत्ताधा-याविषयी संताप व्यक्त करताना दिसून आले.
गुडेवार यांना पुन्हा
पदभार घेण्याचा आदेश
पालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी विनंती बदली मागून पदभार सोडला असला तरी शासनाने त्यांना तत्काळ पदभार स्वीकारण्याचा आदेश दिला आहे. तसा आदेश बुधवारी दुपारी नगरविकास मंत्रालयातून महापालिकेस प्राप्त झाला. त्यानुसार आयुक्त गुडेवार हे उद्या गुरूवारी पुन्हा पालिकेत पदभार स्वीकारतील, अशी अपेक्षा आहे.
नगरविकास विभागाचे प्रधान सचिव श्रीकांत सिंह यांनी गुडेवार यांनी तातडीने महापालिकेत रूजू होऊन पदभार स्वीकारावा, असा आदेश ई-मेलद्वारे पाठविला आहे. या आदेशात गुडेवार यांनी विनंती बदली मागितली असून त्यावर शासन योग्य कार्यवाही करील. मात्र आपण सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार तत्काळ सांभाळून प्रशासकीय कामकाज चालवावे, असे फर्मान सोडण्यात आले आहे.
गेल्या सोमवारी दुपारी आयुक्त गुडेवार यांनी पाणी प्रश्नावर पालिकेतील सत्ताधारी काँग्रेसच्या नगरसेवकांनी आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन करून आयुक्तांना खुर्ची रिकामी करा म्हणून घोषणाबाजी केली होती. यात आयुक्तांना अवमानितही करण्यात आले होते. त्यामुळे अखेर गुडेवार यांनी विनंती बदलीचे पत्र शासनाला पाठवून पदभार सोडला होता.