शासनाने रास्त भावाच्या धान्य दुकानात ग्राहकांना पुरवठा करणाऱ्या जीवनावश्यक वस्तूच्या कमिशन व रिबेट दराची वाढ रेशनिंग दुकानचालकांना गेली २० वर्षे दिलेली नसल्याने रेशनिंग दुकानचालक तोटय़ात आहेत. त्यामुळे क्विंटलमागे १५० रुपयांची वाढ करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
सावंतवाडी, तहसीलदार, जिल्हाधिकारी, पालकमंत्री व आमदार यांना सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील रेशनिंग दुकानचालकांनी निवेदन दिले. नायब तहसीलदार खोर्रजुवेकर यांनी आज निवेदन स्वीकारले.
रेशनिंग दुकानचालकांना शासनाने २० वर्षांपूर्वी कमिशन व रिबेट मंजूर केले आहे. त्यानंतर महागाई होऊनही त्यात वाढ केली नसल्याने रेशनिंग दुकानदार तोटय़ात गेल्याने दुकानचालकांचे प्रचंड नुकसान होत आहे, असे या निवेदनात म्हटले आहे.
शासनाकडून एक क्विंटलमागे कमिशन ५० रुपये व रिबेट १४ रुपये ५६ पैसे मिळून ६४ रुपये ५६ पैसे एवढे मिळते, पण आज प्रत्यक्षात ११२ रुपये खर्च येत असल्याने निव्वळ ४७ रुपये ४४ पैसे तोटा सहन करत दुकाने चालविली जात आहेत.
रेशनिंग दुकानदाराला कमिशन व रिबेट प्रति क्विंटल १५० रुपये मिळावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली. शालेय पोषण, आहार व रोजगार हमी योजनेंतर्गत धान्यपुरवठा संदर्भातील बिले २००२ पासून मिळालेली नसल्याने ती कमिशन बिले मंजूर करावीत, अशी मागणी करण्यात आली.
या संदर्भात येत्या ३ डिसेंबरच्या दुकानदारांच्या बैठकीत चर्चा करण्याचे ठरले. रेशनिंग दुकानदारांच्या बैठकीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
या वेळी खरेदी-विक्री संघाचे सभापती गुरुनाथ पेडणेकर, उपाध्यक्ष अरुण गावडे, संचालक अभिमन्यू लोंढे, सुनील देसाई, सखाराम ठाकूर, गणेश भाईप, नारायण सावंत, ज्ञानेश्वर ठाकूर, दीपक जाधव, लक्ष्मण माळकर, संजय मळीक, राजेंद्र वाळके, सोनू नार्वेकर, दादा देसाई, संतोष गावडे, विकास सावंत, अनंत नाईक, प्रकाश देसाई, तुकाराम गावडे, शांताराम बांदिवडेकर, सदानंद कोलगावकर आदी उपस्थित होते.