रत्नागिरी : खेड पोसरे येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत १७ जण बेपत्ता असल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये सात घर दरडी खाली गाडली गेली होती. अजून शोध कार्य सुरु आहे. यामध्ये सात जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

जिल्हा माहिती कार्यालयाकडून मिळाल्या माहितीनुसार खेड पोसरे येथे काल झालेल्या दरड दुर्घटनेत बेपत्ता असलेल्यांमध्ये रंजना रघुनाथ जाधव (५० वर्ष), रघुनाथ जाधव (५५ वर्ष), विकास विष्णु मोहिते (३५ वर्ष), संगिता विष्णु मोहिते (६९ वर्ष), सुनिल धोंडीराम मोहिते (४७ वर्ष), सुनिता धोंडीराम मोहिते (४२ वर्ष), आदेश सुनिल मोहिते (२५ वर्ष), काजेल सुनिल मोहिते (१९वर्ष),सुप्रिया सुदेश मोहिते (२६ वर्ष), विहान सुदेश मोहिते (६वर्ष), धोडीराम देवू मोहिते (७१ वर्ष), सविता धोडीराम मोहिते (६९वर्ष), वसंत धोडीराम मोहिते (४४ वर्ष), वैशाली वंसत मोहिते ( ४४ वर्ष), प्रिती वसंत मोहिते (९ वर्ष ), सचिन अनिल मोहिते (२९ वर्ष ), सुमित्रा धोडू म्हापदी (वर्ष ६९) यांचा समावेश आहे.

हेही वाचा- “यावेळीही कोकणवासीयांची बिस्कीट आणि मेणबत्त्यांवर बोळवण करू नका”

या दुर्घटनेत जखमी झालेल्यामध्ये अनिल रघुनाथ मोहिते (४९ वर्ष), वसंती रघुनाथ मोहिते (६८ वर्ष), प्रिती सचिन मोहिते (२७ वर्ष), सुरेश अनिल मोहिते (२७ वर्ष), सनी अनिल मोहिते (२५ वर्ष), सुजेल वसंत मोहिते(१८ वर्ष), विराज सचिन मोहिते (४ वर्ष), यांचा समावेश आहे.

तसेच तालुका मंडणगड पान्हळे खु येथे बाळराम गोविंद काप यांचा बैल नदीच्या प्रवाहात वाहून गेला आहे . शोध कार्य सुरु आहे. लाटवण येथे पुल खचल्यामुळे महाड – मुंबई -पुणे रस्ता बंद आहे. मुगीज येथे जिल्हा परीशद शाळ नंवर १ च्या भिंतीवर आंब्याचे झाड पडून नुकसान झाले आहे.

आंबा घाटात देखील दरड कोसळली

रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील आंबा घाटमार्गे वाहतूक थांबली आहे. या भागात पावसामुळे दरड कोसळल्याने वाहतूक बंद केली आहे. रस्त्यावरील वाहतूक सुरु होण्यास दोन दिवस लागणार असल्याची शक्यता आहे. दरड कोसळून रस्ता खचला असल्याने पावसाच्या पाण्याबरोवर माती व दगड रस्त्यावर आले आहेत. बांधकाम विभागाकडून वाहतूक सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत.