रत्नागिरी जिल्ह्यात एकीकडे करोनाबाधित रूग्ण सापडल्याचे प्रमाण वाढते असतानाच गेल्या २४ तासांत तब्बल दीडशेहून जास्त रूग्ण करोनामुक्त झाले आहेत.

जिल्ह्यात बुधवारी सायंकाळपासूनच्या २४ तासांत ९३ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे गेल्या ५ महिन्यात  एकूण बाधित रुग्णांची संख्या २ हजार ५८०  झाली आहे. त्यापैकी सध्या ७२० सक्रीय रूग्णांवर उपचार चालू आहेत. पण याचबरोबर, जिल्ह्यातील विविध क्रोधाचा निगा केंद्र यांमधून मिळून १५३ जण करोनामुक्त झाल्यामुळे त्यांचीही एकूण संख्या १७६९ (६८ टक्के) झाली आहे. त्यापैकी सर्वात जास्त, ८५ रूग्ण रत्नागिरीच्या समाजकल्याण विभागाच्या कोव्हिड निगा केंद्रातील आहेत.

नव्याने सापडलेल्या ९३ करोनाबाधित रूग्णांपैकी बहुसंख्य रूग्ण नेहमीप्रमाणे  रत्नागिरी (२०), चिपळूण व खेड (प्रत्येकी १६), आणि दापोली तालुक्यातील (१२) आहेत. त्याचबरोबर, अ‍ॅन्टीजेन चाचणीद्वारे ३० बाधित रूग्ण निष्पन्न झाले आहेत. त्यापैकी काही परजिल्ह्यातून आलेले आहेत. मुंबईसह एम.एम.आर.क्षेत्र तसेच इतर जिल्ह्य़ातून  आल्यामुळे  गृह विलगीकरणात असलेल्या चाकरमानींची संख्या ५२ हजार ७३८ इतकी आहे.

जिल्ह्यातील करोनाच्या जास्त प्रादूर्भावामुळे घोषित २०२ प्रतिबंधित क्षेत्रांपैकी बहुसंख्य, १७० क्षेत्रे प्रामुख्याने  चिपळूण (८९), खेड (४७) आणि रत्नागिरी (३४) या तीन तालुक्यांमधील आहेत.

दरम्यान, गेल्या २४ तासांत ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रत्नागिरी तालुक्यातील उद्यमनगर  (रत्नागिरी) येथील ८३ वर्षीय महिला रुग्ण, लाला कॉम्प्लेक्स (रत्नागिरी) येथील ५९ वर्षीय रुग्ण आणि माळनाका (रत्नागिरी) येथील ६५ वर्षीय रुग्ण, तसेच गुहागर तालुक्यातील कोडंकारळ येथील ३८ वर्षी रुग्णाचा त्यामध्ये समावेश आहे. त्यामुळे करोनाबाधित एकूण मृतांची संख्या  ९१ झाली आहे.