गुहागरात बीच फेस्टिव्हलचे आयोजन
नाताळ, सरत्या वर्षांला निरोप आणि त्याच वेळी नववर्षांच्या स्वागतासाठी रत्नागिरी जिल्हा सज्ज झाला आहे. यासाठी येणाऱ्या पर्यटकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, त्यांच्या आदरातिथ्यात तसूभरही कमतरता राहणार नाही याची विशेष दक्षता महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व खासगी हॉटेल व्यावसायिकांनी घेतली आहे. श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथील महामंडळाची निवासस्थाने महिनाभर आधीच आरक्षित झाली असल्याने अनेक पर्यटकांनी खासगी हॉटेल्सचा आसरा घेतला आहे.
दरम्यान महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक संचालनालय व गुहागर पर्यटनप्रेमी यांच्या संयुक्त विद्यमाने २९ व ३० डिसेंबर या कालावधीत गुहागर येथे ‘गुहागर बीच फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कार्याध्यक्ष किरण खरे यांनी दिली.
कोकणची लोककला, कोकणी मेवा तसेच येथील नैसर्गिक सौंदर्य पर्यटकांना भुरळ घालणारे आहे. निसर्गाने दिलेल्या या अनमोल संपत्तीचा योग्य वापर व्हावा यासाठी हॉटेल व्यावसायिकांसह काही पर्यटनविषयक संस्थांना शासनाने वेळोवेळी सहकार्य करून त्यांना उत्तेजनही दिलेले आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने तर कोकणात येणाऱ्या पर्यटकांना उत्तम सुविधा पुरविण्याबरोबरच त्यांच्या सुरक्षेसाठी आता सुरक्षा यंत्रणाही उभारली आहे, असे पर्यटन महामंडळाचे वरिष्ठ व्यवस्थापक पवार यांनी सांगितले. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड व ठाणे या कोकणातील चार जिल्ह्य़ांत पर्यटकांच्या सोयीसाठी वीस ठिकाणी रिसॉर्ट्स उभारले आहेत. पर्यटकांचा पर्यटन हंगामात वाढता ओघ असल्याने महामंडळाची निवासस्थान व्यवस्था अपुरी पडते. निवास व न्याहरी योजना राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक मानले जाते. यामुळे या योजनेंतर्गत १८७ ठिकाणी ही व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर घरगुती निवास-न्याहरी योजनेलाही पर्यटकांचा उत्तम प्रतिसाद आणि मागणी विचारात घेऊन ही सुविधा आणखी वाढविण्यात येणार असल्याचे पवार यांनी सांगितले.