निकाला आधीच उमेदवारांकडून विजयोत्सव

रत्नागिरी : पावसाचे सावट आणि भातकापणीच्या कामामुळे  रत्नागिरी जिल्ह्यातील विधानसभेच्या पाचही मतदारसंघांमध्ये सोमवारी दिवसभरात संथ गतीने एकूण सुमारे ६० टक्के मतदानाची नोंद झाली.

जिल्ह्यातील पाच मतदारसंघांमध्ये १ हजार ७०३ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्राया शांतपणे पार पडली. त्यापैकी एकूण ४३ ठिकाणी मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी आल्या. पण तेथे तातडीने पर्यायी व्यवस्था करण्यात आल्यामुळे मतदानाच्या कामकाजावर परिणाम झाला नाही.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मतदारांनी सकाळच्या सत्रात मतदानासाठी गर्दी केली, पण शहरी भागात प्रतिसाद कमी होता. दुपारी ३ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी मतदान ४५ टक्के झाले .

हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा दिल्यामुळे मतदार प्रक्रीयेवर पावसाचे सावट होते. त्यामुळे मतदारांना मतदानासाठी बाहेर काढण्याचे मोठे आव्हान उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांपुढे होते. पण सकाळी पाऊस नसल्याने ग्रामीण भागातील शेतकरी आणि महिला वर्गानेही मतदानासाठी गर्दी केली. त्यामुळे काही ठिकाणी मतदारांच्या रांगा दिसून आल्या.

पण दुपारनंतर अनेक ठिकाणी पाऊस सुरु झाल्यामुळे मतदारांसह  गावागावात विविध राजकीय पक्षांकडून लावण्यात आलेल्या बुथवरील कार्यकर्त्यांचीही तारांबळ उडाली .

रत्नागिरी उशिरापर्यंत मतदान

मावळंगे (ता. रत्नगिरी) येथे सायंकाळी मतदानाला गर्दी झाली. त्यामुळे सहा वाजेपर्यंत आलेल्या मतदारांना चिठ्ठय़ा देण्यात आल्या. सायंकाळी सात वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रीया सुरू होती. तेथे १२५६ पैकी ८३६ मतदारांनी मतदान केले.

निकालाआधीच विजय मिरवणूक

सायंकाळी सहा वाजल्यानंतर रत्नगिरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजून विजयाचा आंनद व्यक्त केला. दोपाली—खेडमध्ये राष्ट्रवादीकडून दापोली येथे संजय कदम यांनी विजयी मिरवणूक काढली तर खेडमध्ये शिवसेनेचे उमेदवार योगेश कदम यांनी फटाके फोडून विजयोत्सव साजरा केला.