रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष उमेश शेटय़े, त्यांच्या सूनबाई कौसल्या शेटय़े यांच्या पाठोपाठ चिरंजीव केतन शेटय़े यांना नगर परिषद पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी मिळाल्यामुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस शेटय़ेंच्या दावणीला बांधली गेली असल्याचे स्पष्ट झाले आहे. नगर परिषदेच्या चार जागांसाठी गेल्या महिन्यात झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने सेनेतून आलेले माजी नगराध्यक्ष शेटय़े आणि त्यांच्या सूनबाईंना उमेदवारी दिली होती. त्यापैकी शेटय़े विजयी झाले, तर सूनबाईंचा पराभव झाला. राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करताना शेटय़े यांनी राजीनामा दिलेल्या प्रभाग २ (अ)च्या जागेसाठी त्यांचे चिरंजीव केतन यांना राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी देण्यात आली आहे. यांच्या विरोधात शिवसेनेचे आमदार व शेटय़े यांचे परंपरागत विरोधक उदय सामंत यांचे कट्टर समर्थक राजेश सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे अप्रत्यक्षपणे सामंत व शेटय़े यांच्यातच ही लढत असल्याचे मानले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी पक्षाचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे उमेश शेटय़े चेले मानले जात असत. नगराध्यक्ष असताना तत्कालीन पालकमंत्री तटकरे यांच्या साहाय्याने शेटय़े यांनी अनेक योजनांसाठी निधी आणला होता. कालांतराने ते शिवसेनेत गेले. पण राष्ट्रवादीचे माजी आमदार असलेले सामंत यांनी मागील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर तेथे शेटय़े यांची घुसमट होऊ लागली होती. त्याचबरोबर सामंत यांच्या समवेत राष्ट्रवादीतील मोठा गट शिवसेनेत गेल्यामुळे या पक्षाची संघटनात्मक ताकद संपुष्टात आली होती.
या राजकीय वातावरणाचा फायदा घेत तटकरे यांच्या आशीर्वादाने शेटय़े यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि पोटनिवडणूकही जिंकली. कोणतीही राजकीय पाश्र्वभूमी नसलेल्या सूनबाई कौसल्या यांना उमेदवारी मिळवून देण्यातही ते यशस्वी झाले. आता त्यांनी आपल्या वॉर्डातून चिरंजीव केतन यांना उमेदवारी मिळवून दिली आहे.
तसेच त्यांना शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्षपदही बहाल करण्यात आले आहे. अशा प्रकारे पक्षाची शहर संघटना शेटय़े यांच्याच दावणीला बांधली गेल्याचे स्पष्ट झाले आहे.