शहरातील सर्व प्रकारचा कचरा ज्या डम्पिंग ग्राऊंडमध्ये टाकण्यात येतो त्याच जागेत असलेल्या जलशुद्धीकरण  प्रकल्पामधून नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने नागरिकांचे आरोग्यच धोक्यात आले आहे. तर डम्पिंग ग्राऊंड परिसरातील रहिवासी दरुगधीयुक्त वातावरणात कसे-बसे जीवन कंठीत आहेत.
मात्र या गंभीर समस्येकडे रनपचे प्रशासन हेतूपुरस्सर दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोप नागरिकांकडून होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व भारतीयांना स्वच्छ भारत, अशी हाक दिली. त्यांच्या हाकेला प्रतिसाद देत भाजपसह काही राजकीय पक्षांच्या बडय़ा नेत्यांनी हातात झाडू घेतला. या मोहिमेत प्रशासनानेही महत्त्वाची भूमिका बजावली.
रत्नागिरी नगर परिषदेने ही स्वच्छता मोहीम आठवडाभर राबवून शहर स्वच्छ केल्याचा डांगोरा पिटला. मात्र शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण प्रकल्पालगतच अख्ख्या शहरातील कचरा डंप केला जात असल्याने परिसरातील रहिवाशांचे दरुगधीमुळे जगणे अत्यंत कठीण झाले आहे.
तर डम्पिंग ग्राऊंडच्या जागेत असलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पातून शहराला पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिकांचे आरोग्यच धोक्यात आले आहे.
शहरालगत साळवी स्टॉप येथे नगर परिषदेचे डम्पिंग ग्राऊंड असून, येथे शहरात जमा होणारा सर्व प्रकारचा कचरा डंप करण्यात येतो. त्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्यच निर्माण झाले असून, तेथील रहिवासी या दरुगधीमुळे बेजार झाले आहेत.
शिवाय या डम्पिंग ग्राऊंडच्या जागेतच न. प.चा जलशुद्धीकरण प्रकल्प असून, येथे शुद्ध (?) झालेले पाणी नागरिकांना पुरविण्यात येते. यावरून शहरवासीयांच्या आरोग्याची काळजी वाहणाऱ्या रनपच्या एकूणच मानसिकतेची कल्पना येते, अशी कडवट व संतापजनक प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
याबाबत वारंवार तक्रारी करूनही त्याकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचे प्रकार संबंधितांकडून चालूच असल्याचा आरोपही होत आहे.
याबाबत नगराध्यक्षांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीने छेडले असता डम्पिंग ग्राऊंडसाठी नपने दांडेआडम येथे नवीन जागा घेतली असून, त्याचे पैसेही भरण्यात आले आहेत.
ही जागा रत्नागिरीचे उपविभागीय अधिकारी (प्रांत) यांनी त्वरित ताब्यात द्यावी, अशी मागणी केल्याचे सांगितले.
 तसेच सध्याच्या डम्पिंग ग्राऊंडवर मुंबईतील महाराष्ट्र नेचर पार्कच्या धर्तीवर गार्डन उभारण्याची योजना असल्याचेही नगराध्यक्ष मयेकर यांनी सांगितले.
या डम्पिंग ग्राऊंडच्या जागेत भविष्यात गार्डन उभारण्याची योजना, तसेच दांडेआडम येथील नवीन जागेत संपूर्ण शहरातील कचरा डंप करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होईपर्यंत बराच कालावधी जाण्याची शक्यता असून, तोपर्यंत सध्याच्या डम्पिंग ग्राऊंडमध्येच कचरा टाकण्यात येणार आहे व त्यातून निर्माण होणारी दरुगधी, तसेच जलशुद्धीकरण प्रकल्पातील शुद्ध (?) पाण्याचा आस्वाद नागरिकांना घ्यावा लागणार आहे, असाच याचा अर्थ होतो.
विशेष म्हणजे डम्पिंग ग्राऊंड आणि जलशुद्धीकरण हे दोन्ही नागरिकांच्या आरोग्याशी निगडित असलेले महत्त्वाचे प्रकल्प एकाच जागेत असून, संपूर्ण देशातील हे एकमेव उदाहरण असावे, अशी प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.