भारतीय संघात प्रतिनिधित्व केल्याचा आनंद वेगळाच असतो. ती संधी ऐश्वर्या सावंतला मिळाली. ऐश्वर्या भारताचा तिरंगा असाच फडकवत ठेव, असे प्रतिपादन माजी कसोटीपटू मिलिंद गुंजाळ यांनी केले.

पहिल्या आशियाई महिला खो-खो स्पर्धेसाठी भारतीय संघातून महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रत्नागिरीच्या ऐश्वर्या सावंतचा सत्कार रत्नागिरी जिल्हा खो-खो असोसिएशनतर्फे करण्यात आला. हा कार्यक्रम छ. शिवाजी क्रीडांगणावर झाला. या वेळी महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या उपाध्यक्षा नेत्रा राजेशिर्के, राज्याचे स्पर्धा निरीक्षक संदीप तावडे, जिल्हा खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष नाना मयेकर, माजी उपनगराध्यक्ष बाळा मयेकर, प्रसन्न आंबुलकर, बाळू साळवी, सुदेश मयेकर, बिपीन बंदरकर, नीलेश भोसले, सदानंद जोशी यांच्यासह अनेक क्रीडाप्रेमी उपस्थित होते.

ऐश्वर्यासह तिचे वडील यशवंत सावंत यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी मार्गदर्शन करताना मिलिंद गुंजाळ म्हणाले, आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धा खेळत असताना भारताचा तिरंगा हातात घेऊन तो फडकवीत मैदानात प्रवेश करावयाचा असतो. त्या वेळी जो आनंद असतो, तो अनुभवण्याची संधी अनेकांना मिळत नाही. ती मला मिळाली होती. ती संधी आज रत्नागिरीच्या ऐश्वर्या सावंतला मिळाली आहे. ऐश्वर्या वयाने लहान आहेस, खेळात सातत्य ठेव आणि अशीच संधी तुला वारंवार मिळावी यासाठी प्रयत्न करीत राहा. खेळामध्ये फिटनेसला फार महत्त्व आहे. त्यासाठी तू प्रयत्न कर आणि उत्तरोत्तर चांगली कामगिरी करत राहा. मिलिंद गुंजाळ यांनी तिचे प्रशिक्षक पंकज चवंडे आणि क्रीडाशिक्षक विनोद मयेकर यांनाही शाबासकीची थाप दिली.

खो-खो खेळाची धुरा संदीप तावडे यांनी सांभाळलेली आहे. खो-खोतील प्रत्येक कामगिरीचा लेखाजोगा ते मला दूरध्वनीवरून सांगत होते. भारतीय संघात ऐश्वर्याची निवड झाल्याचा फोन आल्यानंतर डोळे भरून आले. प्रतिकूल परिस्थितीचा सामना करीत तिने ही भरारी घेतली आहे. भविष्यात तिची पूर्णत: जबाबदारी माझी राहील, असे सांगत प्रसन्न आंबुलकर यांनी ऐश्वर्याला दत्तक घेत असल्याचे जाहीर केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजीत गोडबोले यांनी केले. कार्यक्रम करण्यासाठी खो-खोच्या सर्वच पदाधिकारी, खेळाडू बहुसंख्येने उपस्थित होते.

सूत्रसंचालक अभिजीत गोडबोले यांनी ऐश्वर्याला काही तरी तू बोलले पाहिजेस असे सांगितले. तेव्हा मििलदसर सरावले आणि त्यांनी ऐश्वर्याची मुलाखत घेतली. सुरुवातीला बोलण्यासाठी आलेल्या ऐश्वर्याने तेवढय़ाच आत्मविश्वासाने सरांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. मिलिंदसरांनी विचारले तुला आणखी काय करायचे आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणाली, खो-खोतील बहुतांशी स्किल मी आत्मसात केली आहेत. यामध्ये प्रशिक्षक पंकज चवंडे, विनोद मयेकर यांचा मोलाचा वाटा आहे. मला भारतासाठी पुन्हा खेळायचे आहे.

रत्नागिरीसारख्या ग्रामीण भागातीस खो-खोला उभारी देण्यासाठी झगडणारे संदीप तावडे आपला एक तरी खेळाडू राष्ट्रीय पातळीवर खेळला पाहिजे, असे स्वप्न घेऊन गेली तीन दशके झगडत होते. आज त्याहून मोठे यश मिळवत रत्नागिरीच्या ऐश्वर्याची भारतीय संघातील निवड झाल्याचा आनंद गगनात न मावणारा होता. तिच्याविषयी बोलण्यासाठी उठलेल्या संदीप तावडेना अश्रू आवरले नाहीत. ऐश्वर्यावर अभिनंदनाचा वर्षांव करतानाच त्यांनी अशीच खेळत रहा असे सांगितले.

देशाबरोबरच रत्नागिरीचे नाव उंचावणाऱ्या ऐश्वर्याच्या प्रतिकूल परिस्थितीबाबत संदीप तावडे यांच्याकडून मला कळले. तिने जी कामगिरी केली आहे त्याला तोड नाही. भविष्यात तिची पूर्णत: जबाबदारी माझी राहील, असे सांगत प्रसन्न आंबुलकर यांनी ऐश्वर्याचे पालकत्व स्वीकारत असल्याचे जाहीर केले.