निजामुद्दीन येथे गेल्या महिन्यात आयोजित ‘तब्लिगी जमाती’च्या कार्यक्रमाला गेलेली रत्नागिरीतील एक व्यक्ती करोनाबाधित असल्याचे तपासणीमध्ये निष्पन्न झाले आहे .

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे  शहरातील राजिवडा परिसरातून या व्यक्तीला गेल्या बुधवारी शोधून जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या घशातील द्रावाचा चाचणी  अहवाल सकारात्मक आला आहे. त्यामुळे राजिवडा परिसर सील करण्याची तयारी जिल्हा प्रशासनाकडून सुरु झाली आहे.

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत आणि जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा  यांनी या संदर्भात पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, राजिवडा येथील ही व्यक्ती १७ मार्चला कोचीवल्ली एक्स्प्रेसने मुंबईहून रत्नागिरीत दाखल झाली. त्यापूर्वी दिल्लीत आयोजित ‘तब्लिगी जमाती’च्या कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला होता. रत्नागिरीत आल्यानंतर राजिवडा येथील मशिदीत ती व्यक्ती आणि त्यांचे चार सहकारी वास्तव्याला होते. लोकवस्तीपासून काही अंतरावर त्यांचे वास्तव्य असल्याचे पुढे आले आहे. त्या व्यक्तीबरोबर कोकण रेल्वेतून आलेल्यांपैकी १० जण चिपळूण, १७ जण रत्नागिरीत, तर २४ जण सिंधुदुर्ग स्थानकावर उतरले आहेत. त्यांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.

स्थानिक नागरिकांनी या व्यक्तीबाबत पोलिसांना माहिती दिली नव्हती. अन्य माध्यमातून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्या व्यक्तीला राजिवडा येथून जिल्हा शासकीय रुग्णालयात आणले गेले . शुक्रवारी चाचणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रशासनाकडून पुढील कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. राजिवडा परिसरातील तीन किलोमीटरचा भाग सील करण्याच्या हालचाली सुरु आहेत. त्या रुग्णाला जिल्हा रुग्णालयात विलगीकरण वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. या परिसरामध्ये पालिका आणि जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून जनजागृतीवर भर दिला जात आहे.

दिल्ली, मुंबई ते रत्नागिरी या रेल्वे प्रवासात ती व्यक्ती कुठे थांबली होती का, याचाही शोध घेण्याचे काम सुरु आहे.

‘जमाती’च्या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांपैकी रत्नागिरी शहर आणि जिल्हा मिळून ११ जणांना उपचारासाठी दाखल केले आहे. त्यापैकी एकाचा अहवाल नकारात्मक आला आहे. उर्वरितांचा अहवाल तपासणीसाठी पाठवण्यात आलेला नााही. याचबरोबर, शहरात गेल्या दहा दिवसांमध्ये मृत झालेल्यांची यादी तयार करण्याचे काम सुरु आहे. त्यांच्या मृत्यूचे कारणही शोधण्यात येणार आहे.

दरम्यान, गेल्या सुमारे दोन महिन्यांच्या कालावधीत विविध ‘जमातीं’चे लोक रत्नागिरीत आलेले आहेत. त्यांची यादी पोलिसांनी  तयार केली आहे. त्यात मुंबईतून ७, नवी मुबंईतून १७, जामा मशिदीतून १४, तर डोंगरीपाडा येथून १२ जण आले आहेत. दिल्लीतूनही एक ‘जमात’ फेब्रुवारी महिन्यात येथे आली होती. अशा प्रकारे विविध भागातून आलेल्या लोकांबाबतची माहिती लपवल्यास गय करणार नाही, असा इशारा जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिला आहे.