‘इसिस’’ ही जागतिक दहशतवादी संघटना देशाच्या किनारपट्टीच्या भागात तळ निर्माण करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती कर्नाटकच्या पोलिसांनी केलेल्या तपासात पुढे आल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यत पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) कर्नाटकात इसिसच्या छावण्यांवर केलेल्या कारवाईत ही माहिती मिळाली आहे. या संघटनेचे भारतीय रूप असलेल्या   अल-हिंदच्या छावण्या असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. इसिसची दक्षिण भारतात बस्तान बसविण्याची योजना आहे. या अतिरेक्यांनी कर्नाटक राज्यातील गुंडलुपेट आणि शिवनसमुद्र जंगलात प्रशिक्षण घेण्याची तयारी केली. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या आरोपपत्रात ही माहिती दिली. कर्नाटकातील कोडगू कोलार त्याबरोबरच शेजारच्या राज्यातही हातपाय पसरण्यास सुरवात केली आहे.  केरळ, महाराष्ट्रातील रत्नागिरी, गुजरातमधील जांभूसात आदी ठिकाणी दहशतवाद्यांनी बस्तान बसवण्याची तयारी केली आहे. काही अतिरेक्यांना राष्ट्रीय तपास यंत्रणांनी अटक केल्यानंतर त्यांच्या चौकशीदरम्यान बरीच माहिती उघड झाली. अल-हिंद अतिरेक्यांनी देश आणि राज्यातील हिंदू नेते, धार्मिक नेते, राजकीय नेते, पोलिस अधिकारी, सरकारी अधिकारी आणि सेलिब्रिटींची हत्या करण्याची योजना आखली होती, असे एनआयएनची माहिती आहे. ते केरळबरोबर महाराष्ट्रातील रत्नागिरी, गुजरातमधील जांभूसार आदी ठिकाणी तळ स्थापण्याची योजना करीत असल्याची माहिती पुढे आली आहे.

दरम्यान येथील जिल्हा पोलीस यंत्रणेला याबाबत माहिती देऊन सावध करण्यात आले आहे. त्यामुळे सागरी सुरक्षा यंत्रणा वाढवण्यात आली असून किनारपट्टीच्या भागात विशेष तपास मोहीम हाती घेतली आहे, असे अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी नमूद केले.