News Flash

रत्नागिरी जिल्ह्य़ात सरासरी ६२ टक्के मतदान

सर्वत्र बहुरंगी लढती झालेल्या रत्नागिरी जिल्ह्य़ातील पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये मिळून सरासरी ६२ टक्के मतदान नोंदवण्यात आले.

| October 16, 2014 04:25 am

सर्वत्र बहुरंगी लढती झालेल्या रत्नागिरी जिल्ह्य़ातील पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये मिळून सरासरी ६२ टक्के मतदान नोंदवण्यात आले. जिल्ह्य़ात सर्वत्र शांततेने मतदान पार पडले असून कोठेही मोठा अनुचित प्रकार घडला नाही.
दापोली, गुहागर, चिपळूण, रत्नागिरी आणि राजापूर या पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या दोन तासांत मतदानाचा वेग चांगला राहिला. या काळात जिल्ह्य़ात सरासरी ११.४४ टक्के मतदान झाले. त्यापैकी गुहागर मतदारसंघात सर्वात जास्त (१४.७५ टक्के) जास्त मतदानाची नोंद झाली, तर सकाळी ७ ते ११ या चार तासांत जिल्ह्य़ात एकूण सरासरी २४.९८ टक्के मतदान नोंदले गेले. त्यामध्ये चिपळूण आणि रत्नागिरी (प्रत्येकी २९ टक्के) आघाडीवर राहिले. दुपारच्या सत्रात मतदानाचा वेग थोडा कमी राहिला. पण ३ ते ५ या वेळात त्यामध्ये सुधारणा होऊन संध्याकाळी ५ वाजेपर्यंत जिल्ह्य़ात एकूण सरासरी ५३.८३ टक्के मतदान झाले. त्यापैकी चिपळूण मतदारसंघ सर्वात आघाडीवर (५९.०९ टक्के) राहिला, तर
रत्नागिरीमध्ये सर्वात कमी (४६.४९ टक्के) मतदानाची नोंद झाली. उरलेल्या तिन्ही मतदारसंघांमध्ये ५० ते ५५ टक्के मतदान झाले.
सकाळच्या सत्रात मतदानाचा वेग जास्त राहिल्यामुळे अनेक मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी आणि रांगा दिसत होत्या. दुपारनंतर मात्र हे चित्र बदलले. पहिल्या चार तासांच्या तुलनेत मतदान कमी होत राहिल्याने एकूण टक्केवारीवर परिणाम झाला.
जिल्ह्य़ातील गुहागर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव आणि भाजपाचे माजी आमदार डॉ. विनय नातू हे मागील निवडणुकीतील प्रतिस्पर्धी याही वेळी रिंगणात आहेत. रत्नागिरी मतदारसंघात माजी मंत्री उदय सामंत यांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी शिवसेनेत प्रवेश करून जिल्ह्य़ाच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. या मतदारसंघातून भाजपाकडून माजी आमदार बाळ माने सलग तिसऱ्यांदा सामंत यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. मतदारसंघात कमी झालेले मतदान दोन्ही बाजूंसाठी चिंतेचा विषय झाले आहे.
दापोली मतदारसंघात सलग सहाव्यांदा निवडणूक लढवत असलेले शिवसेनेचे आमदार सूर्यकांत दळवी यांच्यापुढे कुणबी समाजाचे नेते शशिकांत धाडवे यांनी मोठे आव्हान निर्माण केल्याचे चित्र आज मतदानाच्या वेळी समोर आले. कुणबी समाजोन्नती संघाच्या बॅनरखाली ते या निवडणुकीत उतरले आहेत. त्याचा फायदा त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय कदम यांना होईल अशी चर्चा आहे.
चिपळूण मतदारसंघामध्ये झालेले जास्त मतदान शिवसेनेचे विद्यमान आमदार सदानंद चव्हाण यांना अनुकूल ठरेल का, याबाबतही शंका व्यक्त केली जात आहे.
या चार मतदारसंघांमध्ये निकालाबाबत काहीशी अनिश्चितता असली तरी राजापूर मतदारसंघातून शिवसेनेचे विद्यमान आमदार राजन साळवी यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 16, 2014 4:25 am

Web Title: ratnagiri records 62 percent average
टॅग : Voting
Next Stories
1 सिंधुदुर्गात २० वर्षांत प्रथमच शांततेत मतदान
2 निवडणूक कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
3 सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात ६५ टक्के मतदान
Just Now!
X