राज्य परिवहन मंडळाने दिवाळीच्या सुट्टीत प्रथमच केलेल्या तात्पुरत्या भाडेवाढीमुळे रत्नागिरी एसटी विभागाला या मोसमात सुमारे दीड कोटी रुपयांचे वाढीव उत्पन्न मिळेल, असा अंदाज आहे.
खासगी वाहतूक संस्थांकडून दिवाळी व उन्हाळी सुट्टीत भरमसाट भाडेवाढ केली जाते. मात्र एसटीच्या तिकिटांचे शुल्क बदलत नाही. यंदा मात्र या संधीचा लाभ घेण्याची योजना राज्य परिवहन मंडळाने आखली आहे. त्यानुसार गेल्या ६ नोव्हेंबरपासून येत्या २५ नोव्हेंबपर्यंत १० टक्के भाडेवाढ जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे रत्नागिरी-मुंबई प्रवासासाठी गाडीच्या श्रेणीनुसार ३९ ते ७८ रुपये आणि रत्नागिरी-पुणे प्रवासासाठी प्रवाशांना ४० ते ८१ रुपये जादा मोजावे लागणार आहेत. रत्नागिरी एसटी विभागाचे मासिक सरासरी उत्पन्न ३० कोटी रुपये आहे. याचबरोबर शहरी व ग्रामीण भागातील प्रवासासाठीही सुमारे १० रुपयांची दरवाढ अपेक्षित आहे. महामंडळाने लागू केलेल्या भाडेवाढीमुळे त्यामध्ये सुमारे दीड कोटी रुपयांनी वाढ होईल, असा अंदाज आहे. मात्र मासिक, त्रमासिक व शालेय पासधारकांना या दरवाढीतून वगळण्यात आले आहे.