रत्नागिरी ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्टय़ा अत्यंत महत्त्वाचा जिल्हा आहे. अनेक नररत्नांच्या पदस्पर्शाने आणि कर्तृत्वाने पावन झालेल्या या जिल्ह्य़ाला निसर्गाचेही वरदान लाभले आहे. हिरवागार निसर्ग, सह्य़ाद्रीचा डोंगराळ भाग, दऱ्याखोऱ्यातील नयनरम्य परिसर,पावसाळय़ात कोसळणारे धबधबे, स्वच्छ, नितळ समुद्रकिनारे, ऐतिहासिक गड-किल्ले, पुरातन मंदिरे आदींचा ऐतिहासिक वारसा या जिल्ह्य़ाला लाभला आहे. येथील सण, उत्सव, परंपरा, कला, संस्कृती, खाद्यपदार्थाच्या माध्यमातून समृद्ध कोकण लोकजीवनाचा आनंद देश-विदशातील पर्यटकांना लुटता यावा आणि यातूनच जिल्’ााच्या पर्यटन क्षेत्राचा विकास व्हावा, या उद्देशाने दि. २, ३ व ४ मे २०१५ या कालावधीत रत्नागिरी येथे जिल्हा पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली असून रत्नागिरीकर पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाली असल्याचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी सांगितले.
दरम्यान या महोत्सवाचे उद्घाटन केंद्रीय अवजड उद्यागेमंत्री अनंत गीते यांच्या हस्ते तर राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम, रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर, सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर, जि. प. अध्यक्ष जगदीश राजापकर, खा. विनायक राऊत तसेच सर्व आमदार यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (२ मे) सायंकाळी ६ वा. होणार आहे; तर महोत्सवाचा सांगता समारंभ राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, जिल्ह्य़ाचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या उपस्थितीत होणार असून राज्याचे पर्यटन राज्यमंत्री राम िशदे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. निसर्गसमृद्ध रत्नागिरी शहरातील भाटय़े चौपाटी आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर हा महोत्सव होणार आहे. महोत्सवातील काही कार्यक्रम स्वा. सावरकर नाटय़गृहातही होणार आहेत. महोत्सवाच्या निमित्ताने जिल्ह्य़ातील पर्यटन वाढीसाठी अनेक उपक्रम आणि योजना राबविण्यात येत आहेत. महोत्सवकाळात जिल्’ाातील थिबा राजवाडा, लोकमान्य टिळक जन्मस्थान, स्वा. सावरकर स्मारक, श्रीक्षेत्र गणपतीपुळे, पावस, मालेश्वर आदी धार्मिक व पर्यटनदृष्टय़ा महत्त्वाच्या स्थळांच्या ठिकाणी अत्यल्प दरात एक दिवसांच्या पर्यटन सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय ओळख बनलेल्या रत्नागिरी हापूस आंब्याची चव देश-विदेशातील पर्यटकांना मनमुराद चाखता यावी तसेच महोत्सवकाळात येणारया पर्यटकांना हापूस आंबा माफक किमतीने उपलब्ध होण्यासाठी जिल्ह्य़ातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे स्टॉल या महोत्सवात लावण्यात आले आहेत.
 महोत्सवाच्या निमित्ताने रत्नागिरी शहराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. तसेच भाटय़े समुद्रकिनारा, रत्नदुर्ग किल्ला, थिबा राजवाडा परिसरासह टेक्निक आधारित शो, तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. स्थानिक प्रशासन व स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने शहराची स्वच्छता, रंगरंगोटी करण्यात आली आहे. महोत्सव सुरू असण्याच्या तीन दिवसांच्या कालावधीत नेत्रदीपक रोषणाई शहराचे सौंदर्य खुलविण्यात येणार आहे. रत्नागिरी महोत्सवाच्या आयोजनातून जिल्ह्य़ाच्या पर्यटन विकासाला नवीन ओळख देण्याची प्रशासनाचा प्रयत्न राहणार असल्याचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी सांगितले. महोत्सवाच्या पूर्वसंध्येला (१ मे महाराष्ट्र दिनी) मुंबई विद्यापीठाच्या कला अकादमी प्रस्तुत सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. मंत्रीमहोदय आणि सन्माननीय लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत होणारा उद्घाटन सोहळा हे महोत्सवाचे मुख्य आकर्षण असणार आहे. सुप्रसिद्ध गायक स्वप्नील बांदोडकर, गायिका बेला शेंडे, धवल चांदवडकर, सावनी रवींद्र, मेघना एरंडे, गायिका शाल्मली खोलगडे, सिमरन कौर, अभिनेते अंशुमन विचारे, अतुल तोडणकर, अरुण कदम, कमलाकर सातपुते, अभिजित चव्हाण, माधवी जुवेकर, नम्रता आवटे, अंकुश काकडे, सारेगम फेम प्रथमेश लघाटे, शमिका भिडे आदी नामवंत कलाकार या महोत्सवात आपली कला सादर करणार आहेत. या मान्यवर कलावंतांचे सादरीकरण हे महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. रत्नागिरीसह संपूर्ण कोकणवासीय आणि राज्यातून तसेच राज्याबाहेरुन येणाऱ्या पर्यटकांसाठी हा महोत्सव पर्वणी आहे.    सोहळय़ाच्या पहिल्या दिवशी उद्घाटन समारंभासह शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे.
स्थानिक ग्रामस्थ आणि संस्थांच्या सहभागातून निघाणाऱ्या या शोभायात्रेत जिल्ह्य़ाचं सांस्कृतिक दर्शन घडविणारे चित्ररथ असतील. विद्यार्थी व युवक पारंपरिक वेषात सहभागी होणार आहेत. भाटय़े चौपाटी परिसरात साहसी युवकांसाठी रॅपिलग, कलाप्रेंमींसाठी वाळूशिल्प स्पर्धा, संध्याकाळी निमंत्रित व स्थानिक कलावंतांचे गुणदर्शन आदी कार्यक्रम होणार आहेत. प्रसिद्ध गायिका शाल्मली खोलगडे आणि सहकारी कलाकारांच्या गाण्याचा बहारदार कार्यक्रमांनी महोत्सवाची पहिली सायंकाळ बहारदार ठरेल. महोत्सवाच्या निमित्ताने पतंग स्पर्धा, नौकानयन स्पर्धा, साहसी खेळांच्या स्पर्धा, नमन, भजन, जाखडी नृत्य, वाळू शिल्प स्पर्धा, छायाचित्र स्पर्धा, महोत्सवासाठी लोगो, घोषवाक्य स्पर्धा असे विविध उपक्रम तालुकास्तरावर घेण्यात आले. या उपक्रमातील विजेत्यांच्या कला आणि कलाकृती महोत्सवात पाहता येणार आहेत.
 प्रत्येक घटकाला महोत्सवात सहभागी करून घेण्यात आले आहे. महोत्सवात हापूस आंब्याची विक्री, रत्नागिरीतील मेवा, कोकणी चवीचे खाद्यपदार्थ असे शंभरहून अधिक स्टॉल असणार आहेत. जिल्ह्य़ातील हा सर्वात मोठा सांस्कृतिक सोहळा ठरणार आहे. या महोत्सवाच्या आनंदात मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.