विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा आरोप

नागपूर : परभणी जिल्ह्यतील गंगाखेड शुगर्सचे अध्यक्ष रत्नाकर गुट्टे यांनी २२ बोगस कंपन्यांच्या माध्यमातून सुमारे २६ हजार शेतकऱ्यांना तसेच व अनेक बँकांना सुमारे साडेपाच हजार कोंटींना फसविल्याचा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मंगळवारी विधान परिषदेत केला. या घोटाळ्यात गुन्हा दाखल होऊनही केवळ सरकारच्या आशिर्वादामुळे आरोपींना पाठिशी घातले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

विधान परिषदेत स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून या प्रकरणाचा भंडाफोड करताना मुंडे यांनी गुट्टे हे दुसरे नीरव मोदी असून ते परदेशात पळून जाण्याच्या तयारीत असल्याचा दावा केला. गुट्टे व त्यांच्या कुटुंबियांच्या नावे एकूण २२ नोंदणीकृत कंपन्या असून यापैकी बहुतांश कंपन्या या निव्वळ कागदावर आहेत.तर काही काळा पैसा पांढरा करण्यासाठी व पैशांची फिरवाफिरव करण्यासाठी काढण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. गुट्टे यांच्या गंगाखेड शुगर्स कारखान्याने हार्वेस्ट अँण्ड ट्रान्सपोर्ट योजनेखाली २०१५ मध्ये ६०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या नावे कर्जे उचलली. मात्र, नंतर त्याची परतफेड केली नाही. त्यामुळे आता या शेतकऱ्यांना २० ते २५ लाख रुपयांच्या वसुलीसाठी बँकांच्या नोटीसा येत असून शेतकरी हवालदील झाले आहेत. गुट्टे यांनी त्यांच्या विविध कंपन्यांमध्ये कसलीही उलाढाल नसतानाही बनावट कागदपत्रे तयार करुन सुमारे साडेतीन ते साडेपाच हजार कोटी रुपयांची कर्जे घेतल्याचा दावाही मुंडे यांनी केला. कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम १८६ (२) मधील तरतुदीनुसार कार्पोरेट गॅरंटीबाबत असलेल्या मर्यादेचे उल्लंघन करून गुट्टे यांनी एका कंपनीकडून कर्जावू रकमा घेवून त्या दुसऱ्य़ा कंपनीला कर्ज रुपाने दिल्या. एवढेच नव्हे तर बोगस दस्तावेजांच्या माध्यमातून गंगाखेड शुगर्स अ‍ॅन्ड एनर्जी लि. कंपनीचे ८० कोटी रूपयांचे भागभांडवल असताना १४६६.४४ कोटींचे कर्ज काढण्यात आले, असे मुंडे यांनी सांगितले.