जिल्ह्य़ात कास्तरटाका येथे दरवर्षी हजारो कोंबडय़ा, बकऱ्यांचा बळी राजकारणी देतात, भूतखेतानी झपाटलेल्याची संचारलेले देव भूत काढतात, तसेच वाहिन्यांवर यंत्रे, नजर सुरक्षा, चालीसा अशा योजनांतून व्यवसाय केला जातो. या गोष्टी अंधश्रद्धेवर आधारित नाही का? ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेस ढोंगी राजकारण्यांनी विरोध केला. त्यांनी अंधश्रद्धा दूर केल्यास शाल, श्रीफळ देऊन जाहीर सत्कार करू, असे सामाजिक कार्यकर्ते भाई देऊलकर व मंगेश तळवणेकर यांनी आवाहन केले आहे. रात्रीस खेळ चाले या मालिकेस ढोंगी राजकारण्यांचा विरोध आहे, असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात भाई देऊलकर व मंगेश तळवणेकर यांनी म्हटले आहे. सिंधुदुर्गात विविध चित्रपट, मालिकांचे चित्रीकरण होत आहे. त्यामुळे सिंधुदुर्गचे निसर्गसौंदर्य, पर्यटन सर्वत्र पोहचत आहे. स्थानिकांना रोजगारदेखील मिळत आहे असे या पत्रकात म्हटले आहे.
‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका अंधश्रद्धा वाढवत आहे, पर्यटक घाबरतील असा कांगावा सुरू झाला. ही मालिका बंद करण्यासाठी काही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला. काँग्रेस व शिवसेनेच्या या विरोधात राष्ट्रवादीनेदेखील उडी घेतली. अंधश्रद्धा दूर करण्यापेक्षा सिंधुदुर्गात अंधश्रद्धेला खतपाणी राजकीय पुढारी घालत आहेत, असे या द्वयींनी म्हटले आहे. जिल्ह्य़ात कासारटाका येथे दरवर्षी हजारो कोंबडी, बकऱ्यांचे बळी देणारे राजकारणी नवस बोलतात. माणसाला झपाटलेल्या भूताखेताचे संकट व त्रास संचारलेले देव दूर करतात. या अंधश्रद्धेच्या गोष्टी आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.
आज टी.व्ही. चॅनलवर दिवसा व रात्री निरनिराळ्या चालीसा, यंत्रे, नजर सुरक्षा कवच यांच्याद्वारे संकटे दूर करणे, उद्योग व्यवसायात यश, परीक्षेत यश, व्यसनमुक्ती अशा अनेक फसव्या जाहिराती जनतेला दाखवून लुबाडणूक होते. त्याकडे राजकीय लोकांनी कशासाठी दुर्लक्ष चालविले आहे, असादेखील प्रश्न केला आहे.
मुंबई शहरात अनेक ठिकाणी दागिने कंपनीची मोठी दुकाने थाटून राशीप्रमाणे हिरे, मोती, माणिक घेतल्याने कार्यसिद्धी होते, अशा जाहिराती करून अंधश्रद्धा पसरविली जाते. सर्वसामान्य माणसांना अंधश्रद्धा वाढविण्यासाठी अशा विविध माध्यमांचा उपयोग करून सामान्य लोकांना गंडा घालणाऱ्यांवर काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत धंदे बंद करून दाखविल्यास शाल, श्रीफळ देऊन जाहीर सत्कार करू, असे भाई देऊलकर व मंगेश तळवणेकर यांनी म्हटले आहे.