मागील महिन्यातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष पदासह व संघटनेच्या सदस्यत्वाचा देखील राजीनामा देत, मंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेत गेलेल्या, रविकांत तुपकर यांनी आज ‘घरवापसी’ करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला आहे. संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी रविकांत तुपकर यांच्या छातीवर संघटनेचा बिल्ला लावून त्यांना प्रवेश दिला.

यावेळी रविकांत तुपकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, संघटनेतील अंतर्गत मतभेदातून आपण स्वाभिमानीला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, संघटना सोडल्यानंतरही आपण राजू शेट्टी आणि अन्य शेतकरी नेत्यांवर टीका न करण्याची भूमिका घेतलेली होती. याचबरोबर आपण राजू शेट्टी यांच्या देखील संपर्कात होतो. आता संघटनेतील मतभेद संपुष्टात आले आहेत, त्यामुळे पुन्हा एकादा संघटना वाढीसाठी जोमाने कामाला लागणार आहे. यावेळी त्यांनी रयत क्रांती संघटनेत आपण कोणतीही अपेक्षा न बाळगता प्रवेश केला होता असेही सांगितले. संघटनेत परतण्याचा वेगळा अर्थ काढला जाऊ नये म्हणून निवडणूक होण्यापूर्वीच मी घरवापसी केल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.

राजू शेट्टी यांचे खंद्दे समर्थक असलेले रविकांत तुपकर यांनी अवघ्या २० दिवसांतच स्वाभिमानी पक्षात घरवापसी केली आहे. राज्यात महायुतीची सत्ता आल्यावर तुपकर यांच्याकडे महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष पद सोपवण्यात आले होते. मात्र, लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांनी महायुतीविरोधात भूमिका घेतल्यानंतर तुपकर यांनी त्या पदाचा राजीनामा दिला होता.

तसेच, रविकांत तुपकर यांनी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना आपण संघटनेचे पद व सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे कळवल्यानंतर, शेट्टी यांनी त्यांना तुम्ही संघटनेत अनेक वर्षे कामं केली असल्याचे सांगून पुन्हा एकदा या निर्णयाबद्दल विचार करावा, असे सांगितले होते. मात्र, काही वेळानंतर तुपकर यांनी थेट राजीनामा पत्र लिहूनच पाठवले होते. तुपकर हे राजू शेट्टी यांचे खंद्दे समर्थक मानले जातात. सदाभाऊ खोत संघटनेतून बाहेर पडल्यानंतर तुपकर हेच दोन नंबरचे नेते आहेत. मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच त्यांना संघटनेची साथ सोडल्याने राजू शेट्टी यांना मोठा धक्का बसला होता.

“मी अनेक वर्षांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेत एक सक्रीय कार्यकर्ता म्हणून कार्यरत होतो. माझ्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी होती. परंतु, आज मी संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा व सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे” असे रविकांत तुपकर यांनी स्वाक्षरीनिशी संघटनेचे अध्यक्ष राजु शेट्टी यांना पत्र पाठवले होते. यानंतर तुपकर हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या देखील चर्चा रंगल्या होत्या. विशेष म्हणजे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली होती.