लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील सर्वच पक्षांनी बहुसंख्य विद्यमान खासदारांना पुन्हा उमेदवारी दिली असली तरी दोन गायकवाड मात्र कमनशिबी ठरले आहेत. लातूरचे सुनील गायकवाड यांना भाजपने उमेदवारी नाकारली, तर शेजारच्या उस्मानाबादचे रवींद्र गायकवाड यांना शिवसेनेने उमेदवारी दिलेली नाही. उमेदवारी नाकारलेल्या दोन गायकवाडांमध्ये आणखी एक साम्य आहे. सुनील गायकवाड यांचे बंधू सार्वजनिक बांधकाम विभागात  सचिव दर्जाचे अधिकारी आहेत. त्यांनाही म्हणे राजकारणात प्रवेश करण्याचे वेध लागले आहेत. रवींद्र गायकवाड यांचे बंधू व्यकंटेश गायकवाड हे राज्याचे जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव आहेत. दोन्ही गायकवाडांचे आपापल्या पक्षातील मतदारसंघांतील कार्यकर्त्यांशी पटत नव्हते. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी खासदार उपलब्ध नसतात, अशा स्वरूपाच्या तक्रारी केल्या होत्या. दिल्ली विमान प्रवासात एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी शिवसेना खासदार गायकवाड हे वादग्रस्त ठरले होते. हे प्रकरण लोकसभेतही गाजले होते. या मारहाणीची शिक्षा म्हणून हवाई वाहतूक विभागाच्या संचालनालयाने खासदार गायकवाड यांच्या विमान प्रवासावर बंदी घातली होती. त्यांच्याबद्दल अनेक कहाण्याही सांगितल्या जायच्या. गुरुवारी भाजपच्या पहिल्या यादीत लातूरच्या गायकवाड यांना नारळ देण्यात आला. लगेचच दुसऱ्या दिवशी शिवसेनेने उस्मानाबादच्या गायकवाडांना घरी बसविले. दोन्ही गायकवाडांना नारळ दिल्यावर या जागा कायम राखण्याचे आव्हान भाजप,  शिवसेनेपुढे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उमेदवारी मागितली वडिलांनी, पण मिळाली मुलाला

काँग्रेसमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत काहीही होऊ शकते याची प्रचीती धुळ्यातील कार्यकर्त्यांना आली असणार. धुळे मतदारसंघातून माजी मंत्री रोहिदास पाटील यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. धुळे काँग्रेसमध्ये गटबाजी तर जोरात. एकमेकांना पाडण्यासाठी टपलेलेच. पण काँग्रेसची अवस्था बघून सारे नेते एकत्र आले. रोहिदास पाटील, अमरिश पटेल यांनी जुने मतभेद गाडून परस्परांना मदत करण्याचे ठरविले. रोहिदास पाटील यांनी संपर्क साधण्यास सुरुवात केली. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी धुळ्यात झालेली राहुल गांधी यांची जाहीर सभा यशस्वी करण्याकरिता रोहिदास पाटील यांनी मेहनत घेतली. पण उमेदवारी रोहिदास पाटील यांचे आमदार पुत्र कुणाल पाटील यांना जाहीर झाली. राज्य काँग्रेसने रोहिदास पाटील यांना उमेदवारी देण्याची शिफारस केली होती. पण राहुल गांधी यांच्या समोर उमेदवारीचा प्रश्न आला तेव्हा कुणाल पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. रोहिदास दाजी पाटील यांना लोकसभा लढण्याची इच्छा होती तर पुत्र कुणाल यांना आमदारकीतच रस होता. पण वयाचा प्रश्न उपस्थित झाला आणि दाजींचा पत्ता कापला गेला.

मुंबईवाला

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ravindra gaikwad sunil gaikwad denied ticket for lok sabha election
First published on: 23-03-2019 at 02:27 IST