कुक्कुटपालनासारख्या किफायतशीर व्यवसायातून महिलांनी सचोटीने प्रयत्न करून जास्तीत जास्त उत्पन्न घ्यावे आणि घरबसल्या कुटुंबाला आíथक हातभार लावावा, असे प्रतिपादन राज्याचे गृहनिर्माण उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्य़ाचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी केले. खेड तालुक्यातील उधळे ग्रामपंचायतीमध्ये शिर्शी गटातील महिला बचत गटाच्या महिलांना पशुसंवर्धन खात्यातर्फे कुक्कुटपालन व्यवसायासाठी पालकमंत्र्याच्या हस्ते पिल्ले, खाद्य व संगोपन साहित्याचे वाटप करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार, उपविभागीय अधिकारी जयकृष्ण फड, तहसीलदार कदम, उपसभापती रवींद्र मोरे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त सुभाष म्हस्के आदी मान्यवर उपस्थित होते. वायकर म्हणाले की, शासन विविध लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून जनतेचा आíथक स्तर उंचावण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचाच भाग म्हणून खेड तालुक्यातील शिर्शी गटातील महिला बचत गटातील महिलांना कुक्कुट पालन व्यवसायासाठी पिल्ले, खाद्य व संगोपन साहित्य वाटप करण्यात आले आहे. कुक्कुट पालनासारख्या किफायतशीर व्यवसायाचा महिलांनी जास्तीत जास्त फायदा घेऊन आपली आíथक उन्नती साधावी. त्याचबरोबर जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त बंधारे बांधावेत. पर्यटन विकासासाठीच्या योजनांचाही लाभ घ्यावा. यासाठी शासनातर्फे सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. कार्यक्रमाला विविध पदाधिकारी, नागरिक व महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.