सतत वादात सापडणारे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. सोलापूरातील महायुतीचा विजयी संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात दानवे यांनी पुलवामा हल्ल्याचा संदर्भ देताना जवानांऐवजी अतिरेकी असा उल्लेख केला. दानवे म्हणाले की, ‘पाकिस्तानने आपले 40 अतिरेकी मारले. त्यामुळे देशात प्रचंड रोष तयार झाला.’ या वक्तव्यामुळे आता दानवे यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. सोशल मीडियावर कडाडून टीका केली जात आहे.

रावसाहेब दानवे यांचा हा व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रसने आपल्या अधिकृत ट्विटर वर पोस्ट केला आहे. हेच का भाजपाचे बेगडी देशप्रेम? असा सवाल राष्ट्रवादीने आपल्या ट्विटर उपस्थित केला आहे. देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या वीर जवानांनाच भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी अतिरेकी ठरवले आहे. असे म्हणच राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा सत्ताधारी भाजपाला लक्ष केले आहे.

सोशल मीडियावर नेटीझन्सनी दानवे यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. एक युझर्स म्हणाला की, तुम्ही मागे शेतकऱ्यांना “साले” बोललात आणि आता शहीद सैनिकांना अतिरेकी म्हणालात.. तुमच्या घाणेरड्या मानसिकतेचा जाहीर निषेध !!दुसरा एका युझर्सने रावसाहेब दानवे यांना प्रदेक्षाध्यक्ष कोणी केलं असा थेट सवाल उपस्थित केला.

दरम्यान, रावसाहेब दानवे यांनी याआधीही अशी वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. दोन वर्षांपूर्वी तूरखरेदीवरून शेतकऱ्यांना ”साले”संबोधल्याने दानवे वादात सापडले होते. ”एक लाख टन तूर खरेदी केली, तरी रडतात साले, असे वादग्रस्त आणि शेतकऱ्यांची अवहेलना करणारे वक्तव्य दानवेंनी केले होते. त्यानंतर त्यांच्यावर चौफैर टीका झाली होती.