भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भोकरदनमधील घराचं अडीच लाख रूपयांपेक्षा जास्त रकमेचं बिल थकवलं आहे. मागील पाच महिन्यांपासून वीज बिलाचा एकही पैसा दानवे यांनी भरलेला नाही त्यामुळे महावितरणला रावसाहेब दानवे यांनी ‘शॉक’ दिल्याची चर्चाच मराठवाड्यात सुरू झाली आहे.

महावितरणला भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यामुळे अकारण अडीच लाख रूपयांचा भुर्दंड सहन करावा लागतोय,तरीही कोणतीही कारवाई झालेली नाही.आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कायम चर्चेत येणारे रावसाहेब दानवे आता वीज बिल थकविल्यामुळे चर्चेत आले आहेत.

सामान्य ग्राहकांनी वीज बिल थकवलं तर महावितरण तत्परता दाखवत त्या ग्राहकाची वीज जोडणी काढून टाकते, तरीही बिल भरलं नाही तर मीटर काढून महावितरण कार्यालयात जमा केलं जातं. मात्र भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याबाबत ही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. सामान्य माणसाला एक न्याय आणि भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना वेगळा न्याय अशी परिस्थिती का आहे? हा प्रश्न आता विचारला जातो आहे.

मागील पाच महिन्यांपासून रावसाहेब दानवे यांनी भोकरदनच्या घराचं २ लाख ५९ हजार १७६ रूपयांचं वीज बिल थकवलं आहे. तरीही त्यांच्यावर कारवाई का होत नाहीये? महावितरणचे अधिकारी राजकीय दबावाखाली काम करत आहेत का? असाही प्रश्न मराठवाड्यातल्या नागरिकांकडून विचारला जातोय.