दहा वर्षांपासून हवाई दलात कार्यरत असणाऱ्या आणि विशिष्ठ उड्डाण तास पूर्ण करणाऱ्या देशातील पहिल्या सुखोई विमानाची संपूर्ण देखभाल व दुरुस्तीचे काम (ओव्हरऑल) विहीत मुदतीत करण्यात हिंदुस्तान एरोनॉटीक्स लिमिटेडला अपयश आल्याची बाब पुढे आली आहे. सुखोई बांधणीच्या तुलनेत काहिशा क्लिष्ट परंतु, महत्वपूर्ण स्वरुपाची ही प्रक्रिया दीड वर्षांत केली जाणार होती. परंतु, अन्य प्रकल्पांप्रमाणे तीही रेंगाळली. विलंबाने का होईना पुनर्तपासणी झालेले हे पहिले सुखोई शुक्रवारी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या उपस्थितीत हवाई दलाच्या स्वाधीन करण्यात आले.
एचएएलच्या नाशिक विभागाने यानिमित्त अलिशान सोहळ्याचे आयोजन केले होते. याप्रसंगी हवाई दलप्रमुख अरुप रहा, एचएएलचे प्रमुख डॉ. आर. के. त्यागी उपस्थित होते. भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात समाविष्ट झालेल्या ‘सुखोई ३० एमकेआय’ या अत्याधुनिक लढाऊ विमानांची पुनर्तपासणी प्रक्रिया साधारणत: तीन वर्षांपूर्वी देशात प्रथमच सुरू करण्यात आली. विशिष्ट उड्डाण तास पूर्ण झाल्यावर प्रत्येक विमानाची सखोल पुनर्तपासणी प्रक्रिया करावी लागते. सुखोईच्या बांधणीची धुरा सांभाळणाऱ्या एचएएलने विशिष्ट उड्डाण तास पूर्ण करणाऱ्या विमानाच्या सखोल पुनर्तपासणीची देखील जबाबदारी स्वीकारली आहे. या अंतर्गत दोन सुखोई विमाने संपूर्ण देखभाल, दुरूस्ती आणि आयुर्मान वाढविण्याचा अभ्यास यासाठी एचएएलच्या नाशिक विभागात दाखल झाली होती. त्यातील पहिल्या विमानाचे हे काम नुकतेच पूर्ण होऊन ते हवाई दलाच्या स्वाधीन करण्यात आले.
विमानातील प्रत्येक यंत्रणा, उपकरण व सुटय़ा भागांची अतिशय सखोलपणे केली जाणारी छाननी आणि त्या अनुषंगाने दुरूस्ती, या प्रक्रियेस लष्करी परिभाषेत ‘ओव्हरऑल’ संज्ञेने ओळखले जाते. नव्या विमानाची बांधणी आणि कार्यरत विमानांची पुनर्तपासणी यात कमालीचा फरक असतो. नव्या विमानाच्या बांधणीत सर्व सुटय़ा भागांची निकषानुसार जोडणी करावी लागते. मात्र, पुनर्तपासणीत काही वर्षे कार्यरत राहिलेल्या विमानाचे सर्व भाग अलग करून सुटय़ा भागांची झीज, यंत्रणांमधील दोष यावर संशोधन केले जाते.
संरक्षण मंत्र्यांनी समाधान व्यक्त करत एचएएलला भविष्यातही कामे मिळणार असल्याचे नमूद केले. हवाई दल प्रमुख अरुप रहा यांनी भारतीय हवाई दल भविष्यातही एचएएलवर मोठय़ा प्रमाणात अवलंबून राहणार असल्याचे सांगितले. एचएएलचे प्रमुख डॉ. आर. एस. त्यागी यांनी ओव्हरऑलसाठी आलेले दुसरे सुखोईचे कामही पूर्ण झाल्याचे नमूद केले.
दरम्यान, नव्याने बांधणी केलेले १५० वे सुखोई विमान यावेळी हवाई दलाच्या स्वाधीन करण्यात आले. एचएएल आणि हवाई दल यांच्यात झालेल्या करारानुसार प्रथम १४० आणि नंतर ४० अशा एकूण १८० सुखोई विमानांची बांधणी करण्याचे
निश्चित झाले होते. त्यानुसार २००५ पासून टप्प्याटप्प्याने विमाने देण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्या अंतर्गत १५० विमान बांधणीचा टप्पा गाठला गेला आहे.