देशात सुरू असलेल्या लसीकरणाबाबत केंद्र सरकारे आज एक मोठा व महत्वाचा निर्णय घेतला आहे. आता १८ वर्षांवरील प्रत्येकाला करोनाची लस दिली जाणार आहे. १ मे पासून ही व्यापकर लसीकरण मोहीमर सुरू होणार आहे. तर, केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आलेल्या ट्विटमध्ये सांगण्यात आहे की, ”आज केंद्र शासनाने १८ वर्षे वयापुढील सर्वांना लस देण्याचा निर्णय जाहीर करून आपल्या मागणीचा विचार केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पंतप्रधान आणि आरोग्यमंत्री यांचे आभार मानले आहेत. राज्यात या अनुषंगाने पूर्ण नियोजन केले जाईल व लसीचा पुरवठा वेळच्यावेळी मिळत राहील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी देशातील २५ वर्षांपुढील सर्वांना लस देण्याची गरज असून तसा निर्णय घेण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली होती.”

यापूर्वी ४५ वर्षावरील नागरिकांना लस देण्याचं नियोजित करण्यात आलं होतं. मात्र करोनाचा वाढता फैलाव पाहता लसीकरणाचा टप्पा वाढवण्यात आला आहे. करोना फैलाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

मोठा निर्णय : १८ वर्षांवरील प्रत्येकाला करोनाची लस; १ मे पासून व्यापक लसीकरण मोहीम

देशात करोनावरील लसीकरणासाठी सरकारी केंद्र आणि खासगी रुग्णालयामध्ये लस घेता येणार आहे. सरकारी केंद्रांवर मोफत लस दिली जात आहे. तर खासगी रुग्णालयात एका डोससाठी २५० रुपये आकारले जात आहेत.

दरम्यान, आज (सोमवार) पंतप्रधानांची काही औषध कंपन्यांसोबत देखील बैठक झाली आहे. भारतात सध्या कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड या लस दिल्या जात आहेत. स्पुटनिक व्हीला सुद्धा आपात्कालीन मंजुरी देण्यात आली. त्यामुळे लसीकरण मोहीमेला येत्या दिवसात वेग येणार असल्याचे दिसत आहे.