केवळ आर्थिक चक्र सुरु करण्यासाठी महाराष्ट्रात ‘मिशन बिगिन अगेन’ सुरु केल असलं तरी कोरोनाचं संकट टळलेलं नाही, धोका टळलेला नाही. गर्दी करू नका, आवश्यक कामासाठीच बाहेर जा असे आवाहन करतांना महाराष्ट्र हा औषधोपचार आणि सुविधा देण्यात कुठेही मागे नसून कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांनी आपला प्लाझ्मा दान केल्यास अनेकांचे प्राण वाचतील असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सोशल मीडियाद्वारे झालेल्या पत्रकार परिषदेत केले. आपण जाणून घेऊया त्यांच्या भाषणातले ठळक मुद्दे.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणातले ठळक मुद्दे

करोनाच्या  केसेस पुन्हा वाढतांना दिसल्या तर नाईलाज म्हणून काही भागांत पुन्हा लॉकडाउन करावे लागेल. आता असे होऊ द्यायचे का याचा निर्णय  तुम्हाला घ्यायचा आहे.

करोनाच्या  संकटकाळात दिवसरात्र शेतात राबून अन्नधान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांनाही मी विनम्र नमस्कार करतो असेही मुख्यमंत्री म्हणाले.

ग्रामीण भागातून बोगस  बियाणांच्या तक्रारी काही प्रमाणात प्राप्त होत आहेत, त्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. शेतकऱ्यांना जे फसवतील त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल होणार

राज्यातील जनतेचा, वारकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून विठ्ठल दर्शनाला जाणार आहे. वारीचा सोहळा यावेळी नाईलाज म्हणून संयम दाखवत साजरा केला जात असतांना वारकऱ्यांचा, राज्यातील विठ्ठल भक्तांचा प्रतिनिधी म्हणून आपण आषाढी एकादशीला विठ्ठुरायाच्या दर्शनाला जाणार असल्याचेही  व त्याच्या चरणी करोनामुक्त राज्याचे साकडे घालणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

कोणतीही चर्चा न करता स्वतःहून सामाजिक भान राखत दहीहंडीचा उत्सव रद्द करणाऱ्या मंडळांचेही आभार मानले. ते म्हणाले की सर्वधर्मियांनी आतापर्यंत अतिशय साधेपणाने सण साजरे केले आहेत. कारण आपण हे सामाजिक भान पाळले नाही तर संकटाचे दार आपोआप उघडणार आहे.

सर्व सार्वजनिक गणेशमंडळांनीही एक सूरात सरकार जो निर्णय घेईल तो मान्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मोठ्या २०/ २२ फूट उंचीच्या मूर्ती स्थापन करण्याची आजची स्थिती नाही. आजच्या संकटाच्या काळात मूर्तीची उंची केवळ ४ फुटांपर्यंत असावी

प्लाझमा थेरपी करणारे देशातील सर्वात मोठे राज्य म्हणून महाराष्ट्र पुढे येत असल्याचे सांगतांना मुख्यमंत्र्यांनी करोनामुक्त झालेल्या रुग्णांनी, ॲण्टीबॉडिज तयार झालेल्या रुग्णांनी पुढे येऊन प्लाझमा दान करण्याचे आवाहन ही केले.

रेमडेमीसीवर, फॅबीपीरावीर, टॅझीलोझुमा ही औषधे आपण वापरतच आहोत. याचा पुरवठा सुरळीत झाला की कुठेही तुटवडा पडू देणार नाही. शासकीय निमशासकीय रुग्णालयात ही औषधे मोफत उपलब्ध करून देण्याचाही प्रयत्न आहे.

महाराष्ट्रातील ज्येष्ठ डॉक्टरांनी पुढे येऊन रुग्णसेवा देण्याचे आवाहन, डॉक्टरांना सगळी सुरक्षा साधनं पुरवणार

गर्दी करून कोरोनाला आपणहून निमंत्रण देऊ नका, गाफील राहू नका असेही आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

१६ हजार कोटींचे करार

गुंतवणूकदारांना महाराष्ट्र आपला वाटतो  ही गोष्ट खूप महत्वाची असून गेल्या आठवड्यात १६ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणूकीचे करार विविध कंपन्यासोबत झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले तसेच यामध्ये भुमीपुत्रांना मोठ्याप्रमाणात रोजगार मिळणार असून त्यादृष्टीने गुंतवणूकदारांना सोयी, सुविधा देण्यावर भर देण्यात आला आहे, त्यांच्याशी चर्चा सुरु आहे असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

घरातच राहा, सुरक्षित राहा

शाळा सुरु होण्यापेक्षा शिक्षण सुरु होण्याला सध्याच्या परिस्थितीत महत्व दिल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ३० जूनला लॉकडाउन संपणार आणि सगळेच व्यवहार पुन्हा सुरु होणार या भ्रमात न राहण्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. आजही ८० टक्के लोकांमध्ये कोरोनाचे लक्षणे नाहीत. पण म्हणून त्यांना प्रादुर्भाव झाला नाही असे नाही असे सांगतांना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला पुन्हा एकदा आवश्यकता नसेल तर घराबाहेर न पडण्याचे, मास्क वापरण्याचे, स्वच्छता पाळण्याचे, सॅनिटायझर वापरण्याचे आवाहन केले