लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोशल मीडियातून प्रचाराचा चांगला परिणाम झाला. आता विधानसभेसाठी इच्छूक उमेदवारांनी याच मीडियाचा आधार शोधला आहे. पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी स्वतंत्र ‘अण्णा लाईव्ह’चे पेज चालू केले आहे,  दुसरीकडे इतरही पक्षांच्या इच्छुकांनी सोशल मीडियावरून आपली ‘डिजिटल छबी’ मतदारांपर्यंत पोहोचविण्यास सुरुवात केली आहे.
जिल्हय़ातील सार्वत्रिक निवडणुका दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रभावी नेतृत्वामुळे नेहमीच लक्षवेधी होत. या वेळी त्यांच्या निधनाने राजकीय रंगारंग काहीसा थंडावला असला, तरी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर सर्वच इच्छूक उमेदवारांनी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियाला प्राधान्य दिल्याचे दिसत आहे.
पाच वर्षांंपूर्वी पाऊण लाख मताधिक्याने विजयी झालेले पालकमंत्री क्षीरसागर साडेचार वर्षांत मतदारसंघात निवडणुकीत सांगावे, असे एकही काम करू शकले नसले, तरी निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी आठवडय़ातील ३ दिवस विकासकामांच्या भूमिपूजनांचा धडाका मात्र लावला आहे. साडेचार वर्षांत केलेल्या भूमिपूजनांची कामे पूर्ण झाली का? याचे त्यांच्याकडे उत्तर नाही. मात्र, निवडणुकीत विकासकामांवर मत मिळते, यावर फारसा विश्वास नसल्याने आता प्रचाराच्या ‘चाली’ बदलू लागल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियातून आपली छबी घराघरात पोहोचवली. याचा चांगला परिणाम दिसून आला, हे पाहून क्षीरसागर यांनीही आता स्वतंत्र जयदत्त अण्णा लाईव्ह हे पेज सुरू केले आहे. या पेजला भरपूर लाईक मिळाल्याचा दावाही केला जात असला, तरी प्रश्नांनी गांजलेले मतदार मतांसाठी पसंती देतात का? हे मतदानानंतरच दिसून येईल. दुसरीकडे सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील रोष पदरात पाडून घेण्यासाठी शिवसेना उमेदवारीचे दावेदार अनिल जगताप यांची ‘अब की बारी दादा तुम्हारी’ ही घोषणा माध्यमांतून फिरू लागली आहे.
महायुतीत बीडची जागा शिवसंग्रामला सोडण्याची मागणी आमदार विनायक मेटे यांनी केल्याने त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियातून या मतदारसंघात दावा केला जात आहे. गेवराईतून राष्ट्रवादीचे आमदार बदामराव पंडित यांची उमेदवारी शरद पवार यांनीच जाहीर केली असली, तरी आमदार अमरसिंह पंडित यांचे बंधू विजयसिंह मदानात उतरणार असल्याच्या तयारीनेच सोशल मीडियातून झळकू लागले आहेत. भाजपकडून अॅड. लक्ष्मण पवार हेही यात मागे नाहीत. आष्टीतील राज्यमंत्री सुरेश धस हे तर लोकसभेपासून सोशल मीडियात सक्रिय आहेत. परळीतून भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा आमदार पंकजा मुंडे पूर्वीपासूनच सोशल मीडियात पुढे आहेत. हा मतदारसंघ काँग्रेसकडे असला, तरी राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य धनंजय मुंडे या मतदारसंघातील कार्यक्रम सोशल मीडियातून लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सतर्क असतात. सोशल मीडियातून नेत्यांची छबी लोकांपर्यंत पोहोचेल. मात्र, नेता आपल्या कामातूनच जनमनात स्थान मिळवू शकतो. त्यामुळे या मीडियाचा निवडणुकीत फायदा किती होतो, हे येणाऱ्या काळातच ठरेल.