आम आदमी पक्षाकडून लोकसभेसाठी नागपूरमधील उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अंजली दमानिया यांनी भारतीय जनता पक्षाचे नेते नितीन गडकरी यांच्यावर निशाणा साधला आहे. गडकरी यांचे आणखी पाच घोटाळे आपण लवकरच बाहेर काढू, अशा इशारा दमानिया यांनी दिला आहे.
दमानिया म्हणाले, लहान मुलांमुळे इतक्या लवकर निवडणूक लढवू नये, असे मला वाटत होते. मात्र, बदलत्या राजकीय स्थितीत भ्रष्टाचाराविरोधात लढण्यासाठी अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असल्याने आता मागे राहता येणार नाही, असे मला जाणवले. त्यामुळेच मी पक्षाची उमेदवारी स्वीकारली.
गडकरी यांचे शरद पवार यांच्यासोबत असलेले संबंध मी २०११ साली उघडकीस आणले होते. त्यानंतर मी गडकरी यांच्याविरोधात आणखी पुरावे गोळा केले असून, त्यांचे आणखी पाच घोटाळे उघड करणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीत गडकरी यांचा सामना करण्यासाठी आपण तयार आहोत, असेही दमानिया म्हणाले. आमचा लढा भ्रष्टाचाराविरोधात असून, आम्हाला देशात बदल घडवून आणायचा आहे. त्यासाठीच आम्ही प्रयत्नशील आहोत, असे त्या म्हणाल्या.