अवनी या टी१ वाघिणीच्या शिकारीवरून सुरु झालेला वाद काही शमताना दिसत नाही. अशात या प्रकरणातील वादग्रस्त शिकारी शआफत अली खान यांनी वेळ पडल्यास अवनीच्या बछड्यांनाही बेशुद्ध करण्यास तयार आहोत असे म्हटले आहे. एवढंच नाही तर आपण कोणत्याही चौकशीसाठी तयार आहोत मी कोणतीही चूक केलेली नाही. उलट माझी बदनामी केल्याप्रकरणी मीच केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांना कोर्टात खेचणार आहे असेही शआफत अली खान यांनी म्हटले आहे. न्यूज १८ लोकमत या वृत्तवाहिनीशी केलेल्या चर्चेत त्यांनी ही माहिती दिली.

अवनीचे बछडे नरभक्षक झाले आहेत कारण अवनी जेव्हा माणसांची शिकार करत होती तेव्हा तेही तिच्यासोबत होते याचाही पुनरुच्चार शआफत अली खान यांनी केला. एवढंच नाही तर संधी मिळाली आणि गरज पडली तर तिच्या दोन बछड्यांनाही बेशुद्ध करू असेही शआफत अली खान यांनी म्हटले आहे.

अवनी वाघिणीच्या शिकारीचा मुद्दा राज्यात चांगलाच गाजतो आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातूनही राज्य सरकारवर टीका केली. तसेच या वाघिणीला थेट ठार करण्याऐवजी बेशुद्ध करायला हवे होते अशीही भूमिका त्यांनी घेतली. तर विरोधकांनीही अवनी वाघिणीच्या शिकारीवरून सरकारवर निशाणा साधला. अवनी वाघिणीची शिकार टाळता आली असती मात्र सरकारने तसे केले नाही.

अवनीच्या शिकारीचे प्रकरण समोर आले तेव्हाच केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली होती. तसेच यासंदर्भात आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही म्हटले होते. सुधीर मुनगंटीवार आणि मनेका गांधी यांच्यात यावरून वादही झाला. अशा सगळ्या वातावरणात वादग्रस्त शिकारी शआफत अली यांनी वेळ पडल्यास अवनीच्या बछड्यांना बेशुद्ध करण्याची तयारी असल्याचे म्हटले आहे.